दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राजकारणात आततायीपणा करून चालत नाही,
राजकारणात अहंकार,उर्मटपणा,तोरा व दुसऱ्याला तुच्छ लेखणे,हे फार काळ चालत नाही.हे स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मतांनी पराभव केला होता.त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेंव्हा स्मृती इराणीच्या कार्यकर्त्यांना हर्षवायू झाला होता.स्मृती इराणी सहजपणे निवडून येतील,असा विश्वास त्यांना वाटला होता.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यानी ” राहुल गांधी यांनी अमेठीमधून पळ काढला,” अशा आरोळ्या ठोकल्या.पण निकाल जाहीर होताच,दस्तुरखुद्द स्मृती इराणी व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तोंड लपवत केंद्रातून अक्षरशः पळ काढला.स्मृती इराणी यांनी मतदारसंघात आपल्या कार्यकाळात कोणतीही विकासकामे केली नाहीत,तसेच गॅस व इंधनाची दरवाढ व त्यांचा उर्मट स्वभाव,इतरांना तुच्छ लेखणे,अशा वागण्यामुळे त्यांना अमेठीच्या जनतेने त्यांना माघारी पाठवले.सार्वजनिक जीवनात तुम्ही लोकांशी कसे वागता,यावर तुमची प्रतिमा तयार होत असते.स्मृती इराणी या हेकेखोरपणा,उर्मटपणा व आक्रस्ताळेपणा या गुणामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या.माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांच्याविषयी त्यांनी ओकलेली गरळ आजही लोकांच्या आठवणीत आहे.मनमोहनसिंह यांच्या काळात गॅस सिलिंडरचे भाव चारशे रु.झाल्यानंतर स्मृती इराणी,हेमामालिनी व तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सिलिंडर डोक्यावर घेऊन आंदोलन केले होते.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्याच सिलिंडरचा भाव हजार पार झाला,पण स्मृती इराणी व हेमामालिनी या दोघींनी अवाक्षर आपल्या तोंडातून बाहेर काढले नाही.केवळ प्रखर वक्तृत्व असून चालत नाही,तर लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो.मोदींचे गुणगान गावून निवडणुका जिंकता येत नाहीत.त्या जिंकण्यासाठी लोकांमध्ये राहावे लागते,त्यांच्याशी एकरूप व्हावे लागते.अन्यथा जनतारुपी सासू ही सुनेला जगू देत नाही,हेच अमेठीच्या जनतेने दाखवून दिले आहे.

