दीपक मोहिते,
” व्यक्तीविशेष,”
पंकजा मुंडे ; अखेर राजकीय वनवास संपला,
- गेल्या महिन्यात माजी मंत्री व स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांचा सात वर्षाचा राजकीय वनवास संपुष्टात आला.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांना प्रदीर्घ वनवास भोगावा लागला होता.ते वक्तव्य काय होते ते पहा,त्यावेळी त्या म्हणाल्या,” मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल,” या त्यांच्या एका वाक्यानंतर भाजपमधील अदृश्य शक्ती सक्रिय झाल्या व त्यांनी पंकजा मुंडे यांना हा राजकीय वनवास घडवून आणला.मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या चिक्की खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यावेळी विरोधकांना माहिती पुरवणारे कोण होते,हे जगजाहीर आहे.त्यामुळे येथे त्यांचे नाव घेणे योग्य होणार नाही.२०१९ साली त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला,हा पराभव कोणी घडवून आणला हे देखील सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.त्यांच्याच कुटुंबातील एका नेत्याला हाताशी धरून त्यांचा पराभव घडवून आणण्यात आला होता.नंतरच्या काळात त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला तो कालपर्यंत…..
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची प्रचंड पीछेहाट झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ” सामूहिक नेतृत्व,” या गोंडस नावाखाली राज्याच्या राजकारणात डावलण्यात आलेल्या नेत्यांचे पुनर्वसन करण्यास सुरुवात केली.या योजनेत पंकजाना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली व त्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना राज्य मंत्रीमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.सात वर्षाच्या राजकीय वनवासाच्या काळात पंकजा मुंडे यांनी जो संयम व समंजसपणा दाखवला,तो खरोखर वाखाणण्याजोगा होता.

