दिपक मोहिते,
आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात असतील…!
पळा पळा कोण पुढे पळे तो..!
आगामी विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या दोन्ही मतदारसंघात तुफान बॅटिंग केल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते.तर याच निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी यांनीही लक्षणीय मते मिळवत दुसरा क्रमांक मिळवला.त्यामुळे महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या ( उबाठा ) अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
वसई व नालासोपारा विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ आ.हितेंद्र ठाकूर यांचे गड असून २००९ चा एकमेव अपवाद वगळता अन्य सर्व निवडणुकांमध्ये आ.ठाकूर यांचे कायम वर्चस्व राहीले.२००९ साली आ.ठाकूर यांनी वैयक्तिक कारणावरून निवडणूक लढवली नाही.त्यांनी वसई मतदारसंघात नारायण मानकर या आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला उतरवले होते. पण या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांनी त्यांचा पराभव केला.हा एकमेव अपवाद वगळता एरवी या दोन्ही मतदारसंघावर आ.ठाकूर यांचेच वर्चस्व राहिले.त्याच वर्षी नव्याने निर्माण झालेल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून आ.ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक लढवली व ते पहिल्याच निवडणुकीत चांगले मताधिक्याने निवडून आले.त्यानंतर २०१४ व २०१९ साली आ.क्षितिज ठाकूर यांनी सलग विजय मिळवला.२०१९ साली शिवसेनेने प्रदीप शर्मा या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीत उतरवले.शर्मा यांनी साम,दाम,दंड,भेद,नितीचा वापर करत विजयाची हवा निर्माण केली.पण आ.ठाकूर यांची लोकप्रियता व वडिलांच्या कामाच्या झंझावातासमोर शर्मा यांची डाळ शिजली नाही.त्या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर विक्रमी मते घेऊन विजयी झाले.त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ.ठाकूर यांच्या बहुजन विकास
आघाडीला जबर फटका बसला.लोकसभा निवडणुकीत लोक बविआला साथ देत नाहीत,हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.२००४ चा एकमेव अपवाद वगळता त्यांना एकही लोकसभा निवडणुक जिंकता आली नाही.या लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाची प्रचंड पीछेहाट झाली.त्यामुळे विरोधी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या प्रचंड उत्साह संचारला आहे.प्रत्येक इच्छुक उमेदवाराने तिकीट मिळवण्यासाठी सेटिंग लावली आहे.भाजपमध्ये राजन नाईक,स्नेहा दुबे,मनोज पाटील,रामदास मेहेर,डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत,शिवसेनेचे ( उबाठा ) पंकज देशमुख,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील,ओनील अल्मेडा, समीर वर्तक,हे सारे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.बविआतर्फे आ.हितेंद्र ठाकूर व त्यांचे चिरंजीव आ.क्षितिज ठाकूर हे दोघे पुन्हा रिंगणात असतील.आ.हितेंद्र ठाकूर यांनी २०१९ साली निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत यापुढे मी निवडणूक लढवणार नाही,असे जाहीर केले होते.पण राज्याच्या राजकारणात होत असलेल्या उलथापालथी लक्षात घेता आ.ठाकूर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देण्याचा फंदात पडणार नाहीत,असा अंदाज आहे.२००९ सालचा अनुभव गाठीशी असताना ते पुन्हा धोका पत्करणार नाहीत,असे वाटते.

