” दीपक मोहिते,”
” बॉटमलाईन,”
” कारगिल विजय दिन ;
दक्षिण आशियात भारतच ” दादा,”
दरवर्षी आपल्या देशात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने घुसखोरी करत काही भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी करत कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला.सुमारे ८५ दिवसाच्या लढाईनंतर भारताने हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले.या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच निंदानालस्ती झाली.भारतीय तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाकच्या सैन्याची अक्षरशः धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना युद्ध थांबवण्यासाठी साकडे घातले.कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवा,त्यासाठी अमेरीकेला मध्यस्थी करायला लावा,अन्यथा जगात आपली नाचक्की होईल असे सांगितले.पंतप्रधान नवाज शरीफही लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या अशा उचापतीमुळे पार वैतागुन गेले होते.आपल्या जवानांचे शिरकाण होऊ नये,म्हणून त्यांनी लगबगीने अमेरिका गाठली व अमेरिकेच्या अध्यक्षांना विनंती केली.बिल क्लिंटन यांच्या सांगण्यावरून भारताने युद्ध थांबवले.लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी आपले वरिष्ठ जनरल व दस्तुरखुद्द पंतप्रधान नवाज शरीफ याना अंधारात ठेवून ही मोहीम आखली होती.पण ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली.पाकची ही कुरापत लक्षात आल्यानंतर आपल्या लष्कराच्या जवानांनी द्रास सेक्टरच्या कारगिलमधील अनेक टेकड्यावर बोफोर्सच्या साहाय्याने तुफान भडिमार केला.भारत इतक्या वेगाने व प्रभावी कामगिरी करेल,अशी पाकच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनाही कल्पना नव्हती.पण भारतीय सैन्याने अत्यंत वेगाने हल्ले चढवल्यामुळे पाक जवानांची अक्षरशः तारांबळ उडाली.या युद्धात पाकचे हजारो जवान मारले गेले. २६ जुलै १९९९ रोजी युद्ध थांबले.या युद्धात आपलेही काही अधिकारी व जवान धारातीर्थी पडले.या युद्धात झालेल्या पराभवाने पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच देशांनी पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले.पाकिस्तानमध्येही परवेझ मुशर्रफ यांच्या या
कृतीविरोधात जोरदार पडसाद उमटले.या प्रकरणानंतर पाक लष्करातही तीव्र मतभेद निर्माण झाले होते.मुशर्रफ यांचा हा निर्णय आत्मघातकी होता,असे सूर पाकिस्तानात उमटले.भारताला कारगिलच्या युद्धात गुंतवून ठेवायचे आणि दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात आघाडी उघडायची,असा डाव मुशर्रफ यांनी आखला होता.परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला.या युद्धात पाकचे अतोनात नुकसान झाले.भविष्यात आपण केलेल्या या आतातयीपणाची नवाझ शरीफ सरकार चौकशी करेल,या भितीमुळे मुशर्रफ यांनी नंतर शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली.त्यानंतर या प्रकरणामुळे मुशर्रफ यांनाही पाकिस्तानातून परागंदा व्हावे लागले.मृत्यू होईपर्यंत त्यांना दुबईमध्ये राहावे लागले.आपल्या जवानांनी मिळवलेल्या या विजयाने पाकला धडा मिळालाच पण भारत दक्षिण आशियात आपण ” दादा,” असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले,.

