दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
स्वबळावर निवडणुका लढण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय अंगलट येणारा,
राज ठाकरे यांनी निवडणुकीची तुतारी फुकली असून राज्यात २२० ते २५० जागा लढणार असून या निवडणुकीत आपण कोणाशी युती करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यांच्या या घोषणेने सर्वांच्याच भुवया वर गेल्या आहेत.स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा निर्णय हा महायुतीला मतविभागणीचा फायदा मिळवून देणारा ठरणार आहे.शिवसेना ( उबाठा ) गटाला दगाफटका करण्यासाठी ही एकप्रकारची खेळी असू शकते.हिंदू मतांमध्ये विभागणी व्हावी,यासाठी अशाप्रकारची रणनिती भाजपने आखली असावी,असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात अनेक जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांना अचानक स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय का घ्यावा लागला ? तर या प्रश्नाचे उत्तर आहे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अपशकुन करणे होय.लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका व राज्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना मिळणारी प्रचंड सहानुभूती,अशा कारणामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन गट व भाजप सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत.पण राज ठाकरे यांचा स्वबळावर निवडणूका लढवण्याचा निर्णय हा त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे.सध्या महायुती सरकारच्या कारभाराबाबत राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीसोबत या निवडणुका लढवायचे टाळलं असले तरी स्वबळावर लढण्याचा त्यांचा निर्णय हा हिंदू मतांची विभागणी करणारा आहे.

