दीपक मोहिते,
राज्यसरकार सपशेल अपयशी ठरले,
- राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक शहरासह ग्रामीण भाग देखील जलमय झाला आहे.मात्र या अशा बिकट परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून खंबीर उपाययोजना होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे,सांगली,मुंबई,
कोल्हापुर,रायगड,रत्नागिरी,नागपूर,वर्धा,पालघर,ठाणे,दौंड,चंद्रपूर,ही सर्व शहरे व ग्रामीण परिसर पाण्याखाली गेली आहेत.पुण्यात तर परिस्थिती अतिशय बिकट झाली असून लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.तर शाळा व शासकीय कार्यालयेही बंद ठेवण्यात आली.अशावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठेही पाहायला मिळत नाही.कदाचित ते अमित शहा यांची मिनतवारी करण्यासाठी दिल्लीत असावेत.
एकेकाळी ” पुणे तेथे काय उणे,” अशी ओळख असलेले पुणे शहर हे सध्या विविध कारणांमुळे सतत प्रकाशझोतात असते.विद्येचे माहेर घर असलेले पुणे शहर आता कोयता गॅंग,हत्या,लूटमार व आता पूरपरिस्थिती यामुळे चांगलेच नावारूपाला आले आहे.
राज्याच्या अन्य जिल्ह्यातही पुण्यासारखीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.परंतु एकही पालकमंत्री मदतकार्य करताना पाहायला मिळत नाहीत.एरवी वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देणारे हे मंत्री व त्यांचे बोलघेवडे प्रवक्ते वृत्तवाहिनीच्या छोट्या पडद्यावरूनही गायब झाले आहेत.राज्यात सरकार असून नसल्यासारखे आहे.पुणे शहरात तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.सरकारने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये इव्हेंट करण्याचे थांबवावे,असे साकडे पिडीत नागरिकांकडून घालण्यात येत आहे.काही जिल्ह्यात धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना इशारा न दिल्यामुळे नागरिक सध्या अडचणीत सापडले आहेत.पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडण्यापूर्वी कोणतीही सूचना दिली गेली नाही,त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणी शिरले व नागरिक घरातच अडकून पडले आहेत.राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून राज्यात सरकार आहे कि नाही ? असा प्रश्न पुणेकर जनता विचारत आहे.

