दीपक मोहिते,
” शौर्यगाथा,”
उद्या ” कारगिल विजय दिवस,” आपल्या जवानांची शौर्यगाथा,
२५ वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानने काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून सुमारे २०५ कि.मी.अंतरावर असलेल्या कारगिल भागात घुसखोरी करून युद्ध छेडले होते.पण आपल्या जवानांनी अत्यंत धाडसी मोहीम राबवत पाकिस्तानच्या लष्कराला पराभूत केले व माघार घ्यायला लावली.
कारगिल,द्रास व मश्को खोऱ्यात हिवाळ्यात सैन्य तैनात करणे,अत्यंत जिकिरीचे असते.या काळात येथील तापमान उणे ४० अंशापर्यत खाली जात असते.त्यामुळे भारतीय व पाकिस्तानी सैन्य याकाळात माघारी जाते.हिवाळा संपला की दोन्ही सैन्य आपल्या मूळ जागी परत येत असतात,असा अलिखित समझौता या दोन्ही देशात झाला आहे.पण तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी काश्मीर व सियाचेन प्रश्नी भारताला कोंडीत पकडण्यासाठी कारगिलमध्ये ही खेळी केली.या भागात भारतीय लष्कराची नाकेबंदी केल्यास त्यांचा अन्नधान्य पुरवठा बंद होईल व भारत,काश्मीर व सियाचेन प्रश्नी चर्चेसाठी टेबलावर येईल,असा परवेझ मुशर्रफ यांचे कारस्थान होते.पण आपल्या लष्कराने तो हाणून पाडला.त्यांच्या जवानांनी मुजाहिदीनचे वेष करून घुसखोरी केली व भारताच्या भूभागावर आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली होती.मात्र त्याच सुमारास एक गुराखी आपल्या गुरांना घेऊन चरण्यासाठी या भागात गेला असता,त्याला पाकच्या लष्कराच्या जवानांच्या हालचाली नजरेस पडल्या.त्यांनी खाली धावत येऊन भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना तशी खबर दिली.त्यानंतर लष्कराने वेळ न दवडता पाक जवानांना पिटाळून लावण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात केली.पण पाकचे जवान उंच भागात होते व ते सतत तोफांचा भडिमार करत असल्यामुळे आपल्या जवानांना वर जाणे,शक्य होत नव्हते.अखेर आपल्या लष्कराने लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या बोफोर्स तोफा आणल्या व तुफान मारा सुरू केला.त्यामुळे पाकच्या सैन्याची तारांबळ उडाली,अनेक जवान मारले गेले.त्यानंतर आपल्या जवानांनी ज्या टेकडीवर पाक सैन्य तैनात होते,त्यावर यशस्वी चढाई केली व उरल्या सुरल्या पाक जवानांचा खात्मा केला व भारताचा झेंडा मोठ्या जल्लोषात कारगिलवर फडकवला.या युद्धात पाकचे हजार ते दीड हजार जवान मारले गेले व आपलेही काही अधिकारी व जवान शहीद झाले.२६ जुलै रोजी ही मोहीम फत्ते झाली.हा दिवस आपण ” कारगिल विजय दिवस,” म्हणून साजरा करत असतो.या घटनेने पाकिस्तानची जगभरात छी थू झाली.भारतिय लष्कराचा आक्रमकपणा पाहून परवेझ मुशर्रफ यांची भितीने गाळण उडाली.त्यांनी पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य लष्कराच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे युद्ध छेडले होते.ते अंगलट आल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ याना भेटून परिस्थिती हाताबाहेर जात असून तुम्ही अमेरिकेला जा व राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन याना मध्यस्थी करण्यासाठी विनंती करा,अन्यथा आपले खूप नुकसान होईल,असे सांगितले.त्यानंतर नवाज शरीफ यांनी क्लिंटन यांची अमेरिकेत जाऊन भेट घेतली व त्यांना विनंती केली.त्यानंतर राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना दूरध्वनी करून युद्ध थांबवण्यास सांगितले,त्यांच्या विनंतीला मान देऊन भारताने युद्ध थांबवले.

