दीपक मोहिते,
” हालाबोल,”
महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली,
तीन इंजिन सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या धुसफूस सुरू झाली आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला निधी देण्यावरून अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते.या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी गिरीश महाजन यांनीही पवार यांना खडेबोल सुनावले.आपल्याकडे पैसा नाहीतर जमिनी विकून तुम्हाला पैसा देऊ का ? असा प्रतिप्रश्न पवार यांनी त्यांना विचारला.अजित पवार यांचे हे वक्तव्य भाजपच्या इतर मंत्र्यांनाही चांगलेच खटकले.अजित पवार यांच्याविषयी महायुतीचे अनेक मंत्री व आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.निधी देताना अजित पवार हे कायम ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” अस करतात,असा त्यांच्यावर सतत आरोप करण्यात येत असतात.खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप भर सभागृहात केले होते.अजित पवार यांच्या अशा वागण्यामुळे ते फार काळ महायुतीमध्ये टिकतील,असे वाटत नाही.या सर्व घडामोडीनंतर अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी लगबगीने दिल्ली गाठली आहे.
गेल्या वर्षभरात तीन इंजिनच्या सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिरापत वाटण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यावर असलेले कर्ज सुमारे आठ लाखाच्या घरात पोहोचले आहे.” लाडकी बहीण,” ” लाडका भाऊ,” वयोश्री,” ” मोफत प्रवास,” व अन्य काही विकासाच्या योजनांवर हे सरकार प्रचंड उधळपट्टी करत आहे.कॅगनेही आपल्या अहवालात सरकारकडून होणाऱ्या उधळपट्टीवर कडक ताशेरे ओढले आहेत.पण तीन इंजिनचे हे सरकार आपल्याच मस्तीत धुंद आहे.आपल्या विभागाला पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे भाजप व शिंदे गटाचे मंत्री,आमदार सध्या प्रचंड नाराज आहेत.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाजन-पवार यांच्यामध्ये झालेली तू,तू,मै,मै,हे अजित पवार यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.यावेळी झालेल्या बोलाचालीत अजित पवार यांनी जमिनी विकून पैसा देऊ का ? असे उर्मटपणे उत्तर दिले.या उत्तराने काही वर्षांपूर्वी ” धरणात पाणी नाहीतर मुतू का ? ” अशी शेतकऱ्यांना दिलेल्या उत्तराची सर्वाना आठवण झाली,अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात होत होती.या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

