दीपक मोहिते,
येणारा काळ मानवासाठी अत्यंत धोकादायक,
सतत आदळणारी वादळे,वरुणराजाचे रौद्र रूप,पावसाचे प्रमाण सतत घटणे,वातावरणात होणारे बदल व तापमान
वाढणे,ही सारी संकटे आता आपल्या पाचवीला पुजली आहेत.दरवर्षी जगभरात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात.पण मानव, नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची आपली वृत्ती सोडायला तयार नाही.
गेल्या काही वर्षांपासून जगभरात निरनिराळ्या वादळानी अनेक देशांचे अपरिमित नुकसान केले.आपला देशही त्यापासून अलिप्त राहू शकला नाही.दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला विशेष करून कोकणाला या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे,गेली अनेक वर्षे निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहोत.गेल्या वर्षी चिपळूण,खेड या तालुक्यात निसर्गाने जो धुमाकूळ घातला,त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.जे कोकण निसर्गरम्य म्हणून ओळखले जाते,त्या कोकणावर निसर्गाचा महाभयंकर कोप का होतो ? हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे,किंबहुना या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची आता गरज भासू लागली आहे.
अशी संकटे आपल्यावर का येतात ? याची उत्तरे जगजाहीर आहेत,मात्र त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात आपली मानसिकता नाही.आज आपण यातून योग्य तो मार्ग काढला नाही तर येणारा काळ संपूर्ण मानवजातीला संकटाच्या खाईत ढकलणारा असेल.
आजवर पर्यावरण व प्रदूषण,या ज्वलंत विषयावर जागतिक स्तरावर खूप विचारमंथन झाले.अनेक देशांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संभाव्य धोका ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे,त्याचे दृश्यपरिणामही आता दिसू लागले आहेत.आपल्या देशानेही हा धोका ओळखला,पण प्रत्यक्षात कृती करण्यामध्ये टाळाटाळ केली.प्रचंड वृक्षतोड,नद्यांच्या पात्राची दिशा बदलणे,डोंगर पोखरणे,खाडीकिनारी असलेल्या मॅनग्रोव्हची सरसकट कत्तल करणे,समुद्रात विषारी सांडपाणी सोडणे व समुद्रकिनारी महाकाय प्रकल्प उभारणे,वसुंधरेला हानी पोहोचवणाऱ्या अशा गैरप्रकाराना आळा घालण्याऐवजी सरकारने कानाडोळा आजवर केला.त्याचे दुष्परिणाम आपण सारे भोगत आहोत.त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

