दीपक मोहिते,
भयाण वास्तव,
आधी हाताला चटके,मग मिळते भाकर,
ग्रामीण भागातील मुलं शिकली सवरली की त्यांची पावले रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या शहराकडे वळू लागतात.गावी असलेल्या कटुंबियाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना असा निर्णय घ्यावा लागतो.मात्र,त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या बायका देखील आपल्या मूलाबाळासह सासू सासऱ्या सोबत न राहता, आपल्या माहेरी निघून जातात.कालांतराने त्याही,” मुलांचे शिक्षण ,” या गोंडस नावाखाली शहरात राहणाऱ्या आपल्या पतीकडे निघून जातात.रोजी-रोटी व मुलांचे शिक्षण,अशा दोन कारणामुळे गावात राहणाऱ्या मायबापाचे उर्वरीत आयुष्य देखील हलाखीत व्यतीत होऊ लागते.पण त्यांना आपले गांव सोडवत नाही.
आपल्या घराला कुलूप लागू नये,म्हणून हे जन्मदाते मायबाप आपले गाव मरेपर्यंत सोडत नाहीत.आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत वृद्ध जोडप्याला हाताने करून खावे लागते.ही परिस्थिती आता बदलण्याची शक्यता नाही,कारण बदलत्या काळात आपली संस्कृती व एकत्र कुटुंबपद्धती आता इतिहासजमा होऊ लागली आहे.वार्धक्याकडे झुकलेल्या मायबापाना आता वर्षातून केवळ दोनवेळा आपली मुले व नातवांचा सहवास लाभतो.गणेशोत्सव व होळी या दोन सणासाठी ही मुले आपल्या बायको मुलासह आठ ते दहा दिवस आपल्या गावी येत असतात.त्यांच्यासाठी हे आठ दिवस एकप्रकारे दिवाळीच असते.

