दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
रितिका चोप्रा यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच….
पत्रकारितेतील चाटूगिरीच्या बजबजपुरीत इंडियन एक्सप्रेसच्या महिला पत्रकार रितिका चोप्राच्या रूपाने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. पत्रकारितेला चाटूगिरीचे ग्रहण लागले असताना रितिका चोप्रा यांनी जे धाडस दाखवले, त्याची तुलना अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणांशी केली तर ते चुकीचे ठरणार नाही.
सर्वप्रथम ५० वर्षांपूर्वी घडलेले हे वॉटरगेट प्रकरण काय होते ? ते कसे घडले ? व राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे कसे चोर ठरले ? ते सर्वप्रथम समजून घेऊया. वॉशिंगटन डी. सी.मधील वॉटरगेट या आलिशान इमारतीमध्ये डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय होते.१७ जून १९७२ रोजी रात्री दोन वाजता सुरक्षा रक्षक फ्रॅंक विल्स याला एका दरवाजावर टेप चिकटवलेली दिसली, त्याने ताबडतोब पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी आतमध्ये लपलेल्या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडे कॅमेरे, मायक्रोफोन व हजारो डॉलर्स सापडले. सुरुवातीला ही सामान्य चोरी वाटली, पण तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. पकडण्यात आलेले ५ जण अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेचे माजी एजंट होते व ते राष्ट्रध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या निवडणूक प्रचार समितीशी संबंधित होते. त्यांना डेमोक्रेटीक पक्षाच्या कार्यालयात चोरून मायक्रोफोन बसवायचे होते. मात्र हे प्रकरण येथेच संपले नाही, द वॉशिंगटन पोस्ट, ” मधील बॉब उडवर्ड व कार्ल बर्नस्टाईन यांनी त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. या दोघांना एक अज्ञात व्यक्ती दररोज रात्री पार्किंग लॉटमध्ये भेटून माहिती द्यायचा. ३३ वर्षे या व्यक्तीचे नांव गुलदस्त्यात होते. २००५ मध्ये कळले कि तो एफबीआयचा क्रमांक दोनचा अधिकारी मार्क फेल्ट होता. वूडवर्ड व बर्नस्टाईन या दोघांनी आपली शोध पत्रकारिता पणाला लावून याविषयावर तब्बल ७०० हुन अधिक बातम्या लिहिल्या. त्यांनी बातम्याच्या माध्यमातून सिद्ध केले कि ही चोरी राष्ट्राध्यक्ष रीचर्ड निक्सन यांच्या सांगण्यावरून झाली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी एफबीआय वर दबाव आणला गेला, साक्षीदारांना पैसे देण्यात आले. त्यानंतर १९७३ मध्ये अमेरिकन सिनेटने चौकशी सुरु केली. राष्ट्राध्यक्ष निक्सन हे ओव्हल ऑफिसमधील प्रत्येक संभाषण गुपचूप टेप करत असत. सुप्रीम कोर्टाने ते सारे टेप मागवून घेतले. ५ ऑगस्ट १९७४ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका टेपमध्ये निक्सन स्पष्ट म्हणत होते, ” एफबीआयची चौकशी थांबवा,” ही टेपच पुरावा म्हणून मान्य झाला व निक्सन यांच्यावर महाभियोग अटळ होता. पण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितले कि तुम्ही दोषी ठराल. अखेर ९ ऑगस्ट १९७४ रोजी निक्सन यांनी टीव्हीवर येऊन राजीनामा दिला. अमेरिकेच्या इतिहासात राजीनामा देणारे ते एकमेव राष्ट्रध्यक्ष ठरले. या दोघा धाडसी पत्रकारांना १९७३ चा पुलीतझर पुरस्काराने गौरवण्यात आले. निवडणूक जिंकण्यासाठी निक्सन यांनी केलेली लबाडी दोन धाडसी पत्रकारांमुळे जगासमोर येऊ शकली. इंडियन एक्प्रेसच्या रितिका चोप्रा यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार याची लबाडी उघडकीस आणण्यात जे धाडस दाखवले, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.. हल्लीच्या चाटूगिरी पत्रकारितेच्या काळात रितिका चोप्रा या आम्हा पत्रकारांसाठी दीपस्तंभ ठरल्या आहेत.

