दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
गोकुळ,अमूलच्या घश्यात घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न,
गोकुळचा वाद आता फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो राज्यभर गाजतोय. मूळ वाद काय आहे ? त्यावर एक नजर टाकल्यास फडणवीस सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस जो काही खुलासा करत आहेत, तो महाराष्ट्राला कदापि पटणारा नाही.
*गोकुळ म्हणजे राज्यातील एक नामवंत सहकारी संस्था असून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून देशात नावारूपाला आली आहे.अमूलनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा दूध संघ म्हणून ओळखला जातो. रोज सुमारे २० लाख लिटर दूध संकलन होत असते.५.५ लाख शेतकरी / दूध उत्पादक संस्थेशी जोडले आहेत. दर १० दिवसानंतर शेतकऱ्यांना सुमारे १०० कोटी रु. बिल दिलं जाते.- उलाढाल सुमारे ३ ते ४ हजार कोटी रु. या संस्थेची १९ ऑक्टो. रोजी निवडणुक पार पडली. एकूण २५ जागांपैकी १३ जागा सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने जिंकल्या.तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या.त्यामुळे संघावर सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता येणे अपेक्षित होते. पण फडणवीस सरकारने चलाखी करत सत्ता हस्तगत करण्याचे षडयंत्र रचले.
संस्थेचा अध्यक्ष निवडीसाठी १४ चा कोरम लागतो. महायुतीचे १२ संचालक पहिल्या बैठकीला गैरहजर राहिले, त्यामुळे अध्यक्ष निवडणूक रखडली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हें.रोजी नव्याने अध्यक्ष निवड घेण्याचे निर्देश दिले.मात्र तत्पूर्वी ४ नोव्हें. रोजी राज्य मंत्रिमंडळाने ५००* *कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त ५ संचालक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. हातातून निसटलेल्या संस्थेवर मागच्या दाराने ताबा मिळवण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.* *राज्यशासनाच्या या निर्णयामुळे*
*महायुती १२ + ४ नियुक्त = १६ म्हणजे महायुतीला बहुमत मिळाले.हा प्रस्ताव अत्यंत लगबगीने राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. या गैरप्रकारामुळे सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला व त्यांनी ५ नोव्हें. रोजी मुंबईत गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेतली व त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, ते म्हणाले,
” मी येताना गोकुळचे गुलाबजाम आणि श्रीखंड आणणार होतो, पण राहून गेले. कारण गोकुळ या नावाचे पदार्थ शेवटचेच पाहून घ्या, उद्या त्यावर ” अमूल, ” चे लेबल लावून गोकुळ संस्था त्यांच्या घशात घालण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.”*
*निवडणूक हरल्यानंतर कायदा बदलून सत्ता हिसकावण्याचा हा प्रयत्न आहे. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जातोय. हा नवीन कायदा फक्त गोकुळला डोळ्यासमोर ठेवून केला आहे. त्यातून साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळण्यात आलं आहे. ज्या लोकांना मतदारांनी नाकारलं, त्यांनाच आता ” तज्ञ संचालक,” म्हणून आणलं जातंय. या षडयंत्रामागे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील हे दोघे आहेत.असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. देशात फक्त अमूल आणि मदर डेअरी, हे दोनच ब्रँड ठेवण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल मिल्क फेडरेशन ही संस्था २० राज्यांमध्ये जाऊन स्थानिक दूध संघ ताब्यात घेऊन एकाच ब्रँडखाली सर्व दूध व्यवस्था आणू इच्छिते,असा आरोप त्यांनी यापूर्वीच केला होता.त्या फेडरेशनमध्ये अमूल, बनास आणि गुजरात मिल्क फेडरेशनची मालकी आहे. त्यांनी यावेळी तीन उदाहरणे दिली.
१ ) कर्नाटक – नंदिनी : अमूलसोबत जाण्याची सूचना आली, तेव्हा ‘ सेव्ह नंदिनी,’ आंदोलन झाल होते.
२ ) मध्य प्रदेश – सांची : रोज १० लाख लिटर दूध गोळा करणारी सांची डेअरी अमूलने घ्यावी, असा प्रयत्न झाला.
३ ) महाराष्ट्र – महानंद : महानंदही अशाच प्रकारे अडचणीत आणल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणी महायुतीचे नेते म्हणतात, हा निर्णय गोकुळमधील पेच सोडवण्यासाठी आहे, सत्ता हिसकावण्यासाठी नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आरोप फेटाळले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, नियुक्त संचालक हे तज्ञ म्हणून असतील. कोल्हापुरात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘कोल्हापूरचा स्वाभिमान महामोर्चा / संघर्ष मोर्चा,’ काढण्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे. काँग्रेस या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. अमूलमध्ये अशाच नियुक्त्या हायकोर्टाने रद्द केल्याचे सतेज पाटील यांनी दावा केला आहे. राहुल गांधी यांनीही याला ” दूध उत्पादकांच्या मतांची चोरी,” आणि ” सत्ताचोरी,” असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही सतेज पाटील यांना फोन करून पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
सतेज पाटील यांच्या मते, ही फक्त संचालक नियुक्ती नाही, तर गोकुळची सत्ता आधी ताब्यात घेऊन नंतर ती अमूल / गुजरात फेडरेशनकडे सोपवण्याची पहिली पायरी आहे. तर सरकार, हा सहकार कायद्यातील सुधारणा असून पेच सोडवण्यासाठी आहे, असा दावा करत आहे.

