दीपक मोहिते,
राजकीय विश्लेषक
रायगड जिल्हा,राजकीय स्थिती,
येणाऱ्या काळात खा. सुनील तटकरे यांची अग्नीपरीक्षा,
रायगड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे सगळ्यात मोठा ” गेम ऑफ थ्रोन्स, ” असा आहे. सरकारमधील तीन राजकीय पक्ष एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानतात व ते एकमेकांच्या विरोधात सतत लढत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) सुनील तटकरे, पालकमंत्री भरत गोगावले ( शिवसेना शिंदे गटाचे ) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या तिघांमधून सध्या विस्तव जात नाही. या जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. अलिबाग – महेंद्र दळवी – शिवसेना ( शिंदे गट ), पेण – रवि पाटील – भाजप, महाड – भरत गोगावले – शिवसेना ( शिंदे गट ), श्रीवर्धन – अदिती तटकरे – राष्ट्रवादी ( अजित पवार गट ), कर्जत – महेंद्र थोरवे – शिवसेना ( शिंदे गट ), उरण – महेश बालदी – भाजप, पनवेल – प्रशांत ठाकूर – भाजप,व खा. सुनील तटकरे – राष्ट्रवादी ( अजित पवार गट )
गेल्या फेब्रु.२६ मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण ५९ जागाचा निकाल खालीलप्रमाणे होता :
शिवसेना शिंदे गट – २१ जागा,
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) – १६ जागा,
भाजप – १५ जागा,
उर्वरित ०७ जागा या शेकाप व शिवसेना ( उबाठा ) यांना मिळाल्या. शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना सत्तेबाहेर ठेवण्यात सुनील तटकरे यशस्वी झाले. त्यांनी भाजपला सोबत घेवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली व भाजपचे मंगेश वाकडीकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाची वर्णी लागली. त्यामुळे शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी या दोघांमध्ये उघड संघर्ष सुरु झाला. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे व भरत गोगावले याच्यातील वाद पराकोटीला गेला व तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात पोहोचला. अमित शहा यांनी या वादामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. शिवसेनेने विधान परिषदेची रायगड – रत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी व त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावे, या तोडग्यानुसार अनिकेत तटकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले तर भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्र्यांची माळ पडली. आता नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकामध्येही ( महाड, अलिबाग, पेण ) हाच पॅटर्न अंमलात येणार आहे. या जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांचे मित्र आहेत, या दोघांनी रणनिती आखून शिंदे गटाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यात यश मिळवले.नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप एकत्र लढणार आहेत तर शिवसेना शिंदे गट एकटा लढणार आहे. दरम्यान अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर सुनील तटकरे यांचे पक्षातील वजन सध्या कमी झाले आहे.अशावेळी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाल्यास तटकरे कुटुंबीयांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या चार ते पाच दिवसापासून सुनील तटकरे यांना हटवून त्यांच्या जागी आ. अनिल पाटील यांना आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना अग्नीदिव्यातून जावे लागणार आहे.

