दीपक मोहिते,
राजकीय विश्लेषण,
उत्तर प्रदेशात काँग्रेस सपासोबत लढणार की भाजपशी थेट भिडणार ?
उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत राहणार की स्वबळावर लढणार ? हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले नाही तर भाजपला मतविभागणीचा फायदा होऊ शकतो.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सपा सोबतच राहणार आहे. पण जागावाटपावरून त्यांच्यामध्ये सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे.
२०२४ च्या लोकसभेत समाजवादी पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंडिया आघाडीने भाजपला यूपीमध्ये ४३ जागांवर रोखले होते. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही आघाडी कायम राहीली आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या दिल्लीत वारंवार भेटी देखील होत आहेत.
मात्र काँग्रेसला १०५ ते १२५ जागा हव्या आहेत, तर सपा त्यांना फक्त ६०-७० जागा द्यायला तयार आहे. त्यामुळे काँग्रेसने ४०३ जागांवर तयारी सुरू केली आहे, तर सपानेही तेवढ्याच जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे.
सध्या दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे की लवकरच होणारी पंचायत निवडणूक दोघे वेगवेगळे लढतील, जेणेकरून ग्राऊंडवरील या दोघांना आपली ताकद कळेल.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांमध्ये सध्या भाजप आणि मित्रपक्षांकडे २९२ आमदार आहेत. समाजवादी पक्षाकडे १०१ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे फक्त २ आमदार आहेत. बसपा हा पक्ष तर जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे या पक्षाची फारशी दखल घेतली जात नाही.
जिल्हानिहाय ताकदीवर नजर टाकल्यास भाजप आजच्या घडीला क्रमांक १ वर आहे.
१ ) पश्चिम यूपी (मेरठ, शामली, सहारनपूर) : येथे जाट आणि मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. येथे सपा – रालोद – काँग्रेस आघाडी मजबूत आहे.
२ ) अवध ( लखनऊ, रायबरेली, अमेठी ): लखनऊ शहरात भाजपच्या ९ पैकी ९ जागा आहेत. पण रायबरेली आणि अमेठीत गांधी कुटुंबाचा प्रभाव असल्यामुळे येथे काँग्रेस- सपा आघाडीला कायम फायदा होत आला आहे
३ ) पूर्वांचल ( वाराणसी, गोरखपूर, आझमगड ): वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा आणि गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड असल्यामुळे येथे भाजपचे चांगले वर्चस्व आहे.
४ ) बुंदेलखंड ( झाशी, बांदा ) : येथील ४ जागा भाजपकडेच आहेत, य भाजप या भागात मजबूत आहे.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा पीडीए फॉर्म्युला – पिछडा, दलित, अल्पसंख्याक हेच भाजपला रोखण्यासाठी मुख्य अस्त्र आहे.
विधानसभा निवडणूक ही सर्वसाधारणपणे फेब्रु.-मार्च २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे.
भाजपकडे योगी आदित्यनाथ यांचा चेहरा आहे. त्यामुळे ठाकूर, ब्राम्हण व ओबीसी मताचे मजबूत गणित भाजपकडे आहे.अखिलेश यादव यांचे पीडीए फार्म्युला ( पीछडा, दलित व अल्पसंख्यांक ) विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच फार्म्युल्यामुळे भाजपला २९ जागावर पराभव पत्कारावा लागला होता. रायबरेलीमध्ये गांधी कुटुंबाचे वर्चस्व असले तरी लखनऊ शहरात मात्र भाजपने ९ पैकी ९ जागा जिंकून इंडिया आघाडीच्या तोंडाला फेस आणला होता. गोरखपूर हा जिल्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड म्हणून ओळखला जातो. येथे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत इतर पक्षाना फारसे काही करता आले नाही. मध्य उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समाजवादी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवले तर ते भाजपच्या पथ्यावर पडेल व योगी आदित्यनाथ यांचे भाजपमध्ये क्रमांक २ चे नेते म्हणून स्थान अधिक बळकट होईल.

