दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
नाशिक राज्यव्यापी शिबिरानंतर सुनील तटकरे यांचे राजकीय भवि्तव्य पणाला लागणार,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार उलथापालथी सूरू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार या दोघांनी पक्षातील प्रस्थापित नेत्यांना वेसण घालण्यासाठी कंबर कसली आहे. याकामी त्यांना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची मदत होत आहे. आई व लेकाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे री – लॉंचिंग होणार आहे. यावेळी पक्षाचा नारा बदलण्यात येणार आहे. अजितदादा हयात असताना ” एकच वादा, अजित दादा असा नारा होता, त्याऐवजी ” आपल्या वहिनी आहेत ना ? आपल्या वहिनी… ” हा नवा नारा देण्यात येणार आहे.अजित दादा हयात असताना त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा उत्तम वापर करून पक्षाला उभारी मिळवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून सुनेत्रा पवार या राज्यभरात जनसंपर्क दौरे आयोजित करणार आहेत. तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांच्याशी होणाऱ्या विलिनीकरणाला ब्रेक देण्यात आला आहे. पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्यानंतर विलिनीकरण प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी आ. अनिल पाटील यांची वर्णी लावण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्याकडे निवडणुकीची रणनिती आखण्याचे काम सोपवण्यात आल्यामुळे भाजप देखील नाराज झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाने अजित पवार यांच्या गटाला भरभरून मतदान केले होते. मात्र आता भाजपने समान नागरी कायदा विधेयक आणण्याचे ठरवल्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवड प्रक्रिया राबवत आहेत, तर दस्तूरखुद्द सुनेत्रा पवार या स्वतः जातीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेत आहेत. नाशिक येथे होणाऱ्या राज्यव्यापी शिबिरामध्ये सुनेत्रा पवार यांचा दबदबा राहावा, यासाठी पक्षातील एक गट चांगलाच सक्रिय झाला आहे. पक्षातील एकंदरीत राजकीय स्थिती लक्षात घेता, या शिबिरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यामागे जनाधार नसल्यामुळे या शिबिरानंतर त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे.

