दीपक मोहिते,
आम्ही खरंच पस्तावलो – वसई / नालासोपाऱ्याचा पापभीरू मतदार
वसई विरार उपप्रदेशाला आता नागरिकांना कोणीच वाली उरलेला नाही. वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन करणाऱ्या नागरिकांनी दोन वर्षांपूर्वी ३५ वर्षाची सत्ता एका दमात उलथवून टाकली. भाजपचा पर्याय समोर आल्यामुळे नागरिकांनी हे धाडसी पाऊल उचलले खरे, पण आज त्या नागरिकांवर पश्चाताप करण्याची पाळी आली आहे.एक खासदार व दोन आमदाराच्या शिदोरीवर भाजपच्या अंगावर सत्तेची झूले चढली. पण त्यांना अवघ्या वर्षभरात झालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेची तिसरी निवडणूक जिंकता आली नाही. त्यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
भाजपमधील गटबाजी व ” हा माझा, हा तुझा, ” हा काँग्रे्सवाल्याचा जुना फॅक्टर भाजपने स्विकारला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा कपाळमोक्ष झाला. गेल्या अडीच वर्षात नव्याने निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची कारकीर्द कधीच प्रभावी नव्हती. या काळात नजरेत भरेल, असे एकही विकासकाम मार्गी लागले नाही. त्यामुळे ज्यांनी, त्यांना दोन वर्षांपूर्वी डोक्यावर घेतले, आज त्या मतदारांना पश्चाताप होत आहे. आज त्यांची अवस्था ” आगीतून फुफाट्यात, ” पडल्यासारखी झाली आहे. आज हे दोन्ही आमदार वारंवार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अमुक विकासकाम मार्गी लागल्याचा दावा करत असतात, पण प्रत्यक्षात ” जमिनी हकीकत, ” मात्र ” अलग हकीकत, बयां करती है, ” आधुनिक पद्धतीचे रुग्णालय, चांगले रस्ते, फेरीवाला व पार्किंग झोन, अनधिकृत बांधकामावर नियंत्रण, दर पावसाळ्यात मनपा क्षेत्रातील तिन्ही शहरे पाण्यात बुडणे, नालेसफाईमध्ये करदात्यांच्या पैश्याची होणारी लूट, वाहतूककोंडी, महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार व लूट करणारे अधिकारी, हे असे अनेक गैरप्रकार या महानगरपालिकेत वर्षानुवर्षे सुरु आहेत. हे सत्तेत परिवर्तन झाल्यामुळे थांबेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. पण ते थांबण्याऐवजी त्यामध्ये सतत वाढ होत गेली. या मनपा क्षेत्रातील कचरा सत्ताधारी, विरोधक व मनपा अधिकारी आता वाटून घेवू लागले आहेत. याला आपण परिवर्तन म्हणायचे का ? कालपर्यंत एकमेकांच्या उरावर बसणारे हे सर्वजण ” आपण दोघे भाऊ भाऊ, एकत्र येऊन धुवून पुसून खाऊ, ” अशा भूमिकेत आले आहेत. कचऱ्याचे वाटप झाले व घरपट्टी व पाणीपट्टी वाढीचा प्रश्नच नाहीसा झाला. नालासोपारा शहराला शूर्पारक नगरी म्हणून नाव देण्याचे पिल्लू सोडून देण्यात आले व विकासाचे सारे प्रश्न गल्लीबोळात बेवारस म्हणून फिरू लागले. मुदत संपलेल्या औषधाचा साठा, कुठे नाहीसा झाला हे नागरिकांना कळले देखील नाही. लोकांच्या दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणारे प्रश्न कोणते आहेत ? याची चाड नसलेली पिल्लावळ आपण निवडून दिल्याचे दुःख आता नागरिकांना होत आहे, पण आता काय करू शकतो ? अशा विवंचनेत ते सापडले आहेत. पण, ” चिडियाँ चुभ गयी खेत, अब पश्तानेसे क्या फायदा ? ” असे म्हणत कपाळावर हात मारून घेण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत.

