दीपक मोहिते,
स्पॉटलाईट,
जगभरात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती अत्यंत धोकादायक,
गेल्या १० वर्षात जगभरात निर्माण झालेली अशांतता व अनेक देशांनी स्विकारलेले विस्तारवादी धोरण लक्षात घेता जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचे जाणवत आहे. पण तिसरे महायुद्ध होईल, असे अनेक युद्धविषयक अभ्यासकाना वाटत नाही.अनेक विकसित देश हे अन्वस्त्रधारी असल्यामुळे महायुद्ध झाल्यास अवघे जग बेचीराख होईल, त्यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. नुकत्याच झालेल्या भारत – पाक युद्धात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दोन्ही देशांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध थांबवले. दुसऱ्या महायुद्धातील जखमा अद्याप भरून निघालेल्या नाहीत. तो अनुभव लक्षात घेता जगातील सारे देश अशाप्रकारचे धाडस करतील असे वाटत नाही.
गेल्या पाच वर्षात अमेरिका / इस्त्रायल – इराण, रशिया – युक्रेन, चीन – तैवान, भारत – पाकिस्तान, ग्रीनलंड – व्हेनेझूएला हे सारे देश सध्या युद्धात होरपळत आहेत. सध्याची परिस्थिती ही १९३९ साली झालेल्या महायुद्धापेक्षा वेगळी आहे. अमेरिका हा बलाढ्य देश आता ” जगाचा पोलीस, ” म्हणून वावरू लागला आहे. अमेरिका, रशिया व चीन या तीन महासत्ता असलेल्या देशांना थेट ” हॉट वॉर, ” नको आहे. तसे युद्ध झाल्यास त्याचे दुरगामी परिणाम जागतिक व्यापारावर होईल व जगातील तमाम देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ शकते. पहिल्या महायुद्धात सगळ्या देशाचे सैन्य एका विशिष्ट ठिकाणी लढले. पण सध्या सुरु असलेले युद्ध हे पाच ते सहा ठिकाणी तुकड्या तुकड्याने सुरु आहे. सायबर हल्ले व ड्रोनच्या सहाय्याने क्षेपणास्त्राचा मारा, त्यामुळे या युद्धाला तिसरे महायुद्ध असे म्हणता येणार नाही. मात्र अशाप्रकारच्या युद्धामुळे आपण महागाई, तेलटंचाई, शेअर बाजारातील घसरण, अशा संकटाना आपण सामोरे जात आहोत.
तिसरे महायुद्ध होऊ नये, असे जगातील प्रत्येक देशाला वाटते. त्यामुळे चीन हा तैवानवर कधीही थेट हल्ला करणार नाही, रशिया – नाटो देशामध्ये अणूयुद्ध होणार नाही. अमेरिका इराणशी दोन हात करतोय, पण तेही इस्त्रायलच्या माध्यमातून, अशा युद्धाला अभ्यासक ” प्रॉक्सी वॉर, ” म्हणतात.आज तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती नसली तरी संपूर्ण त्यावेळी असलेल्या स्थितीत आपण नक्कीच वावरत आहोत. कारण चीन हा हिंद महासागरात आपले लष्करी बळ वाढवत आहे, पाकिस्तान हा तुर्की, सौदी अरेबिया, बांगला देश, संयुक्त अरब अमिराती, कुवेत व कतार या मुस्लिम राष्ट्राना एकत्र आणून भारतासमोर * इस्लामिक नाटो, ” तयार करू पाहत आहे.

