दिपक मोहिते,
पब्लिक क्राय हा न्यायदान प्रक्रियेत अडथळा होता कामा नये,
रमेश किणी व्हाया पूजा चव्हाण ते थेट दिशा सालियन असा जो कटकारस्थानाचा प्रवास झाला. यामध्ये बदनामीचा एक समान धागा असल्याचे दिसून येते. या तिन्ही प्रकरणात सेम पॅटर्नचा वापर झाल्याचे पाहायला मिळत आहे. १९९५ महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत विराजमान झाले व हा बदनामीचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी रमेश किणी हत्याप्रकरणी बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे राज्यसरकारने मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यांनी केलेल्या तपासामध्ये राज ठाकरे यांना क्लीनचिट मिळाली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबई पोलिसांच्या तपासावर राजकीय दबाव होता, असे आरोप करण्यात आले. यावेळी झालेल्या प्रचंड पब्लिक क्राय लक्षात घेऊन राज्यसरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपवला. या तपासात राज ठाकरे यांचा कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले व राज ठाकरे या अग्निदिव्यातून सहिसलामत बाहेर पडले. पुरावे, वस्तुजन्य परीस्थिती व महत्वाचे दुवे अशा तीन निकषावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाचा तपास केला व राज ठाकरे यांना क्लीन चिट मिळाली. एखाद्या व्यक्तीला पब्लिक क्राय वरून दोषी ठरवता येत नाही, हे या प्रकरणावरून सिद्ध झाले.पण ज्या व्यक्तीवर असे बेछुट आरोप करण्यात येतात ती व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढवते ? याचाही विचार व्हायला हवा.
त्यानंतर २५ वर्षानंतर शिवसेना ( उबाठा ) गटाचे आ. संजय राठोड यांच्यावर पूजा सावंत हीची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात असलेल्या राजकीय लोकांनी केला. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यानी संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. या काळात संजय राठोड यांच्याविरोधात झालेल्या पब्लिक क्रायची तीव्रता इतकी प्रचंड होती कि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर २०२२ मध्ये सत्ता बदल झाला व संजय राठोड यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामावून घेण्यात आले. संजय राठोड यांना क्लीनचिट कशी मिळाली ? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
दिशा सालियन प्रकरणी तीच्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, हे एकवेळ मान्य केले तरी आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी राजकीय मंडळी सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा युवा चेहरा म्हणून उदयाला येणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासह तीन ते चार जणावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्या व्यक्तीने २०२० साली या प्रकरणी आदित्य ठाकरे दोषी नसल्याचे स्पष्ट केले होते. ती व्यक्ती सहा वर्षाने माझ्या मुलीवर अन्याय झाला सांगत एफआयआर नोंदवतो, मातोश्रीवर जाऊन नोटीस चिकटवतो व ५०० कोटींचा दावा करतो. हे सारे विस्मयजनकच आहे. आदित्य ठाकरे हे या प्रकरणी दोषी असतील तर त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी. केवळ पब्लिक क्राय व बदनामी करून त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही. कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी ” पब्लिक क्राय, ” हा निकष होता कामा नये, न्यायालयाने या घातक प्रक्रियेला वेळीच पायबंद घालायला हवा.

