दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन, ”
भारताचे १२ हजार नागरिक १३ देशाच्या तुरुंगात…
आशिया खंडातील अनेक देशाचे नागरिक विविध गुन्ह्याखाली अनेक देशाच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. या नागरिकांचे देश आपापल्या परीने त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करत असतात. मात्र ही प्रक्रिया अत्यंत किचकट स्वरूपाची असल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळू शकत नाही.
गेल्या काही वर्षात भारताचे पाकिस्तान – २१९, चीन – १७३, इटली – १६८, श्रीलंका – १४३, नेपाळ – ११८७, अमेरिका – २४७९, संयुक्त अरब अमिराती – २७७३, कतार – ७४०, थायलंड – ५००, सौदी अरेबिया – २६४७, व कुवेत – ३८७,मलेशिया – ३७१ व युनायटेड किंगडम ( ब्रिटन ) – २८८ असे एकूण १२ हजार ७५ नागरिक तुरुंगात खितपत पडले आहेत. पाकिस्तान व श्रीलंका, या दोन देशात जे नागरिक अटकेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भरणा मच्छिमारांचा आहे. हे मच्छिमार, मासेमारी करताना चुकून सागरी सीमा ओलांडून या दोन देशाच्या हद्दीत गेल्यामुळे या देशाच्या तटरक्षक दलाने त्यांना ताब्यात घेतले आहे. या व्यतिरिक्त इतर देशातील कैदी विविध गुन्ह्याखाली तुरुंगवास भोगत आहेत. वास्तविक आपल्या सरकारने पाकिस्तान व श्रीलंकेच्या तुरुंगात सजा भोगत असलेल्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे, पण तसे प्रयत्न होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

