दीपक मोहिते,
कृषी पर्यटन तरुणांना वरदान ठरू शकते,
समुद्रकिनारी वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा असून शेती, बागायती व विपुल वनसंपदा असलेल्या जिल्ह्यात आता नागरीकरणाला चांगला वेग आला आहे. नागरी, डोंगरी व समुद्री अशा तीन भागात विखुरलेला असा हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील भूमिपुत्र हे भातशेती व बागायती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात.

मात्र,गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा, बदलते हवामान,अवकाळी पाऊस व पर्जन्यमानाचे प्रमाण उतरणीवर जाणे, आदी कारणामुळे भूमीपुत्राची मुले शेती व बागायती व्यवसायात आपले नशीब आजमवण्या ऐवजी इतर व्यवसायात स्थिरावू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषीक्षेत्र आता दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अनेक तरुण आता रिसॉर्टस व फार्महाऊस या व्यवसायात उतरू लागले आहेत. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात समुद्रकिनारी असलेल्या गावागावात रिसॉर्टस संस्कृती चांगलीच फोफावली आहे. अल्पावधीत वसई,पालघर व डहाणू या तीन तालुक्याच्या समुद्रकिनारी भागात चारशे ते पाचशेच्या आसपास रिसॉर्टस डौलात उभी राहिली. तर डोंगरी भागात जंगलपट्टीत अनेक फार्महाऊस दिसू लागले आहेत. रिसॉर्टस सोबत फार्महाऊस माध्यमातून व्यवसायिकांना चांगले अर्थाजन व स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.” स्वस्त आणि मस्त,” असे स्वरूप असलेल्या रिसॉर्टसना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. एक दिवसाच्या पिकनिकसाठी पर्यटक, या रिसॉर्टसना पहिली पसंती देऊ लागले आहेत. आपले आईवडील संपूर्ण हयातीमध्ये शेतीतून जे कमवू शकले नाहीत, ते त्यांच्या मुलांनी अवघ्या दोन ते तीन वर्षात कमावून दाखवले. दिवाळी व उन्हाळी सुट्टी दरम्यान तसेच ख्रिसमस, नववर्षदिन, होळी व रंगपंचमी या दिनी येथील सर्व रिसॉर्टस हाऊसफुल्ल होत असतात. सकाळचा चहा, नाश्ता, दुपारी चवदार जेवण व संध्याकाळी घरी निघताना चहा, असा भरगच्च कार्यक्रम असतो.तसेच रेनडान्स, तरण तलावात यथेच्छ पोहणे व विविध प्रकारचे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची दिवसभर लयलूट करता येते.या निसर्गरम्य जिल्ह्याला राज्यसरकारने पर्यटनाचा दर्जा द्यावा,अशी मागणी स्थानिक भूमिपुत्राकडून सतत करण्यात येत आहे. पण केंद्र व राज्याचे पर्यटन विभाग त्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत आहेत.स्थानिकांना रोजगार देणाऱ्या व्यवसायाला सरकारने मदत करायची गरज आहे. सध्या राज्य सरकारने कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या व्यवसायाला विविध योजनांतर्गत तरुणांच्या फार्महाउसला अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचे धोरण अंमलात आणल्यामुळे जव्हार, डहाणू व पालघर भागात कृषी पर्यटन बाळसं धरू लागले आहे.

