दीपक मोहिते,
मान्सूनने यंदा चांगलाच इंगा दाखवला…
यंदा मान्सून अपेक्षा नसताना वेळेआधी दाखल झाला होता, नंतर मात्र तो कुठे गायब झाला, हे कळायला मार्ग नाही. मान्सून राज्यात कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतो,असा अंदाज व्यक्त करणारे हवामान तज्ञ देखील बुचकळ्यात सापडले आहेत. सद्यस्थितीत तो कुठवर पोहोचला आहे, हे सांगणे कठीण झाले आहे. तो पुन्हा कधीही दाखल होऊ शकतो, असे मोघम खुलासे करण्यात येत आहेत.
मान्सूनने वाकुल्या दाखवल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. २७ मे रोजी मान्सूनने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात प्रवेश केला होता. तत्पूर्वी १६ मे रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्याचे अंदमान – निकोबार बेटावर आगमन झाले होते. या बेटावर आगमन झाल्यानंतर साधारणपणे सहा ते सात दिवसात त्याची आपल्या राज्यात बरसायला सुरुवात होते. पण आता १५ दिवस उलटून गेले तरी त्याचा पत्ता नसल्यामुळे कृषिक्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. खरीप हंगामातील शेतीची प्राथमिक कामे खोळंबल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते पुढील एक ते दोन दिवसात मान्सूनची बंगालच्या उपसागरात त्याची आगेकूच सुरू होईल, पण काही तज्ञानी मात्र या दाव्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. पाऊस लांबल्यामुळे विदर्भात उष्णतेचा कहर सुरू असून या विभागातील सर्व जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्शियसवर पोहोचले आहे. यंदा निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे मान्सूनचे लवकर आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मेच्या दुसऱ्या आठवड्यात शेतीच्या कामाना वेग दिला होता. पण हे सारे अंदाज फसल्यामुळे शेतकरी,शेतमजूर व कृषी क्षेत्राशी संबधित घटक सध्या अडचणीत आले आहेत.

