दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
विलीनीकरण व उमेदवारी देणे,हे दोन्ही विषय कडीकुलपात बंद,
गेल्या चार दिवसांपासून बहुजन विकास आघाडी हा शिवसेनेत ( शिंदे गट ) विलीन होणार व भाजप,सेनेच्या क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात माजी महापौर राजीव पाटील यांना उतरवणार, अशा वावड्या उठत होत्या. या वावड्या आता हवेतल्या हवेत विरल्या
आहेत.आजच्या घडीला महायुतीमधील तिन्ही पक्षाकडे अपुरे संख्याबळ असले तरी फडणवीस व शिंदे हे दोघेही मॅनेज संस्कृतीमघ्ये माहीर असल्यामुळे ते शेवटच्या क्षणी काही करू शकतात. या दोन्ही पक्षाना बविआच्या कुबड्याचा आधार घ्यावा लागेल,असे वाटत नाही.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे असलेले ७१ सदस्य आपल्या बाजूला वळवण्यासाठी हे दोघे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे पक्षाचे विलीनीकरण यांच्यासाठी क्षुल्लक बाब आहे. हे दोघे त्या भानगडीत न पडताही वेगळ्या मार्गाने माजी आ.ठाकूर यांचे सहकार्य पदरात पाडून घेऊन शकतात.
दुसरीकडे गेली तीस वर्षे एकहाती सत्ता राखणारे माजी आ.ठाकूर हे देखील दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या हातचे बाहुले होणार नाहीत. त्यामुळे विलीनीकरण व उमेदवारी देण्याचा विषय आता संपल्यात जमा आहे. निवडणुकीपूरते भाजप किंवा शिवसेना आ.ठाकूर यांना जवळ करतील,पण कायम स्वतःसोबत ठेवणार नाहीत. कारण वसई तालुक्याबाहेर ( उर्वरित पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, बोईसर,
विक्रमगड व वाडा सह ठाणे जिल्ह्यातील मीरा – भाईंदर ) त्यांचे अस्तित्व अत्यन्त नगण्य असणे व स्थानिक पातळीवरील त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बविआशी असलेले विळ्या भोपळ्याचे नाते, लक्षात घेऊन भाजप व शिंदे गट त्यांना जवळ करणार नाहीत. लोकसभा व विधानसभा मतदारसंघात वसई,नालासोपारा व बोईसर मतदारसंघात झालेले पराभव व मनपा निवडणुकीत निम्यावर आलेले संख्याबळ, अशा कारणामुळे हे दोन्ही पक्ष बविआला जवळ करतील,असे वाटत नाही.समजा त्यांना जवळ केले तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेणे,भाजप किंवा शिंदे गटाला परवडणारे नाही. त्यामुळे विलीनीकरण व उमेदवारी देणे, हे दोन्ही विषय पुन्हा बंद पेटीत गुडूप झाले आहेत. दर निवडणुकीच्या वेळी एखादे सनसनाटी विधान करून खळबळ उडवून देण्याची बविआ नेत्यांची नेहमीची सवय आहे. त्यांच्या या खळबजनक विधानाला डोक्यावर घेऊन धुमाकूळ घालणारे युट्युबर्स या तालुक्यात पायलीला पन्नास आहेत. त्यामुळे चार ते पाच दिवस असे विषय चघळत राहतात.

