दीपक मोहिते,
बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी )
युद्ध आता थांबायलाच हवे,
इराण – इस्त्रायल या दोन देशातील युद्धाला येत्या २८ मे रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, यासाठी जगातील सारे देश देव पाण्यात टाकून बसले आहेत. निर्णय अंतिम टप्यात आला असला तरी समृद्ध युरेनियमचा तिढा जोवर सुटत नाही, तोवर युद्ध थांबेल,असे वाटत नाही. पाकिस्तान मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडत असला तरी ” समृद्ध युरेनियम आमच्या हवाली करा,” ही अमेरिकेची मागणी इराण मान्य करेल, असे वाटत नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये हे युद्ध अधिक काळ चालणे, हे जगातील एकाही देशाला परवडणारे नाही. हे युद्ध अधिक काळ लांबले तर ते अमेरिकेलाही परवडणारे नाही, हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी आता मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. पण इराण मात्र या चर्चेत आपली ताठर भूमिका सोडायला तयार नाही.” आमचे जे काय व्हायचे असेल ते होईल, पण एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ द्या,अशा निर्णयाप्रत आला आहे. त्याच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिका सध्या बॅकफूटवर गेली आहे.
मात्र, हे युद्ध थांबायला हवे,असे जगातील तमाम देशांना वाटत आहे. या युद्धाचा थेट परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. वाढत्या महागाईमुळे दस्तुरखुद्द अमेरिका सध्या होरपळत आहे. त्यामुळे अमेरिकन जनता रस्त्यावर उतरून ट्रम्प प्रशासनाविरोधात एल्गार पुकारू लागली आहे. हा असंतोष असाच वाढला तर अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात जनमत तयार होईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसमध्येही ट्रम्प प्रशासनाच्या युद्धनितीच्या विरोधात सिनेटर्स आता उतरू लागले आहेत.या युद्धात आपले जवान मारले जाणे, तसेच दुसऱ्या देशाच्या युद्धासाठी आपल्या देशाच्या तिजोरीतून अवाढव्य खर्च होणे, याला अमेरिकेतील सर्व घटकांचा विरोध आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात ९० लाख अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले. अमेरिकन नागरीकांमध्ये उफाळून वर आलेला रोष व संताप पाहून ट्रम्प काहीसे नरमले व त्यांनी इराणला चर्चेसाठी टेबलावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नाला पाकिस्तानने चांगली साथ दिली. पाकिस्तान हा देश इराण व अमेरिकेचा मित्रदेश असून त्याच्या शब्दाला मान देऊन इराण टेबलावर येईल, अशी ट्रम्प यांना खात्री होती,आणि अगदी तसेच घडले. गेल्या महिन्याभरात इराण व अमेरिकेचे अनेक वरिष्ठ नेते यांच्यामध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अनेक बैठका झाल्या. मात्र या बैठकीत अद्याप ठोस असा निर्णय होऊ शकला नाही. मात्र,दोन्ही देशांच्या भूमिकेत बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
या तीन महिन्यांच्या काळात अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेला तडे गेले. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून कच्चे तेलाची वाहतूक रोखली. त्यांच्या या आक्रमक कृतीमुळे अनेक देश अडचणीत आले. ही बंदी जर अशीच चालू राहिली तर जगात हाहाकार उडेल, अशा भितीमुळे अमेरिकेचे अनेक मित्रदेश त्यांच्यापासून दोन हात दूर राहिले.अगदी नाटो ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ) या संघटनेचे सदस्य देखील या युद्धपासून लांब राहिले. ट्रम्प यांनी वेळोवेळी या देशांना आवाहन केले, पण एकाही देशाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे अवसान पार गळून पडले. या सर्व घडामोडीनंतर ट्रम्प हे आपली ताठर भूमिका सोडून मवाळ झाले. त्यांच्यामध्ये झालेला हा बदल हा एकप्रकारे इराणचा नैतिक विजय ठरला. या सर्व धुमश्चक्रीत चीन व रशिया हे दोन्ही बलाढ्य देश मात्र इराणच्या मागे कायम ठामपणे उभे राहिले. या दोघांकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर इराणसारख्या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकदुऱ्या काढण्यात यश मिळवले.
अशा या युद्धात इतर देशांप्रमाणे आपल्यालाही खूप काही सोसावे लागत आहे. देशात महागाईने डोके वर काढले असून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन महागले की त्याचा परिणाम कृषी, उद्योग व व्यापार या तीन महत्वाच्या क्षेत्रावर होत असतो.तसा तो झाला, पण यावेळी त्याची तीव्रता कितीतरी पटीने अधिक आहे. इंधनाची पुरवठा साखळी खंडित झाली की त्याचा अनेक क्षेत्रावर परिणाम होत असतो. आज आपण सारे त्याचा अनुभव पावलोपावली घेत आहोत. निर्यात ठप्प झाल्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी झाला आहे. निर्यातीवर बंधने आल्यामुळे व्यापार उदीमाला उतरती कळा आली आहे. जीडीपी सात टक्क्यांवर घसरला आहे. वेगाने होणारी घसरण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेने दुसऱ्या लॉकडाऊन सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले आहे. जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन त्यांनी हे आवाहन केले आहे. आपला देश हा ८५ % कच्चे तेल व गॅस परदेशातून आयात करतो, ही वाहतूक रोखली गेल्यामुळे प्रत्येक देशाच्या उद्योग व व्यापार क्षेत्रावर होणारे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. त्यामुळे हे युद्ध आता थांबायला हवे, अन्यथा जगातील अनेक देश धायकुतीला येतील.

