दीपक मोहिते,
पाऊस राज्याच्या उंबरठ्यावर ; शेतकरीवर्ग आनंदात….
मान्सून केरळमध्ये पोहोचला असून येत्या ४८ तासात कोकण किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी असून हवामानखात्याने दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील शेतकरी चांगलेच सुखावले आहेत.
राज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र गेल्या महिन्याभरात उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे यावेळी मान्सूनचे आगमन लवकर होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.गेले दोन दिवस पालघर जिल्ह्यात अधून मधून पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुगीचा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत. राज्यात खरिपाच्या हंगामात भात, नागली व नाचणीचे पीक घेण्यात येते. ही शेती केवळ पावसाच्या पाण्यावर होत असते, त्यामुळे राज्यातील शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची चातकासारखी वाट पाहत असतात. मात्र दरवर्षी हा पाऊस शेतकऱ्यांना हुलकावणी देत असतो. साधारणपणे जुनच्या मध्यास पडणारा पाऊस हा मध्येच दडी मारतो. त्याची ही विश्रांती किमान १५ दिवसाची असते. त्यामुळे शेतात पेरण्यात आलेले बी बियाणे व टाकण्यात आलेली खते वाया जात असतात.वरुणराजाच्या अशा वागण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते. दरवर्षी शेतकऱ्यांना अशा संकटाला तोंड द्यावे लागते. यंदा तशी स्थिती निर्माण होऊ नये, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पावसाने जशी सहकार्याची भूमिका घेतली आहे. तशीच भूमिका शेतीशी संबधित विभागानेही दाखवली आहे. यंदा बी – बियाणे,खते व मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले मजूर देखील उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची प्राथमिक कामे गेल्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात आली आहेत. आता प्रतीक्षा आहे ती मुसळधार पावसाची,तो जर येत्या दोन दिवसात कोसळला तर शेतीची कामे वेळेआधी हातावेगळी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र उत्तरार्धात पावसाने दडी मारता कामा नये, तसेच अवकाळी व परतीच्या पावसाने जाता जाता शेतकऱ्यांना इंगा दाखवता कामा नये..

