दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा खरा चेहरा समोर आला आहे…
नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामागे चीनचे कारस्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात सत्तेत आलेले राजकीय पक्ष हे चीनच्या नादी लागले होते.चीन हा नेपाळमध्ये सध्या प्रचंड आर्थिक गुंतवणूक करत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प त्यांच्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने सुरु करण्यात आले आहेत.
पाच महिन्यापूर्वी नेपाळमध्ये सत्तातर होऊन बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाले. त्यांनी आल्या आल्या भारतासोबत कटुता निर्माण होणारे अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. माजी पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी आपले संबंध चीन मुळे ताणले गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर आपले संबंध सुधारतील, असं वाटलं होतं. पण अलीकडच्या काळात पंतप्रधान बालेन यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर नजर टाकली तर ते उलट सातत्याने प्रखर भारतविरोधी भूमिका घेत आहेत, असं पाहायला मिळाले.
पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना भेटण्यास नुकताच नकार दिला. त्यामुळे ही घटना दोन देशातील परराष्ट्र धोरण व परस्पर राजनीतिक संबंध यावर परिणाम करणारे ठरले आहेत. मिस्त्री दोन आठवड्यापूर्वी नेपाळला जाणार होते. नेपाळ-भारत परराष्ट्र संबंध मजबूत करणं हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. पण बालेन शाह यांनी मी माझ्या समकक्ष सोबत बैठक करणार, असं स्पष्ट करत भेटण्यास नकार दिला. त्यामुळे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा दौरा रद्द झाला आहे. हा भारताला एकप्रकारे धक्का असून या प्रकरणी भारताने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
हे सारे रामायण घडल्यानंतर कालापानी आणि लिपूलेखचा जुना मुद्दा त्यांनी पुन्हा उकरून काढला आहे. मानसरोवर यात्रेसाठी चीनकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेला आमची संमती नसल्याचं बालेन शाह यांनी म्हटले आहे. कालापानी आणि लिपूलेख हे आपले भाग असल्याचा नेपाळचा दावा आहे. के.पी. ओली यांच्या कार्यकाळात नकाशाही बदलण्यात आला होता.
सत्तातर होण्यापूर्वी नेपाळच्या तराई प्रांतात राहणारे मधेश नागरिक नेपाळची सीमा ओलांडून भारतात सामान विकत घ्यायला यायचे. त्यामुळे त्यांना महागाईपासून दिलासा मिळायचा. पण बालेन सरकारने आता नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार भारतातून शंभर रु.पेक्षा अधिक किंमतीचे सामना विकत घेतलं, तर कस्टम ड्युटी लावण्यात येणार आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणारे नेपाळी नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नेपाळ सरकारने अजून एक नियम लागू केला आहे. आधी नेपाळ सीमेनजीक राहणारे भारतीय नागरिक सहजपणे नेपाळमध्ये येजा करत असत. पण आता त्यांना नेपाळला जाण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. तपासणी झाल्याशिवाय भारतीय नागरिक आता नेपाळला जाऊ शकत नाहीत.
वास्तविक नेपाळ या देशाची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबुन आहे.भारत केरोसीन, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू नेपाळला देत आला आहे. पण गेल्या काही वर्षात चीनी ड्रॅगनने नेपाळमध्ये हातपाय पसरले व नेपाळच्या राज्यकर्त्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. बालेन शहा यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या परराष्ट्र धोरणात बदल होईल, अशी अपेक्षा होती, पण बालेन शहा देखील चीनच्या नादी लागून भारतविरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. चीनचे नेपाळमध्ये हातपाय पसरणे,हे भारताला भविष्यात धोकादायक ठरू शकते.

