दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कॉक्रोच जनता पार्टी ; सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे…
समाज माध्यमावर धुमाकूळ घालत असलेल्या ” कॉक्रोच जनता पार्टी, ” च्या असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेश प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामागे ” शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरी, ” हे एकमेव कारण आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत शिक्षण व्यवस्थेचे जे बाजारीकरण झाले, त्यामुळे देशभरातील कोट्यावधी तरुणांना सध्या प्रचंड नैराश्य आले आहे. खाजगी शाळा,महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेसना रालोआच्या काळात मोकळे रान मिळाले आणि त्यांनी अक्षरशः लूट केली. त्यामुळे आज आपली शिक्षण व्यवस्था पार रसातळाला गेली आहे.केंद्रीय व राज्याच्या शिक्षण विभागात ” कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही,” अशी स्थिती निर्माण झाली आहे.खाजगी शिक्षण संस्था व कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या संस्थाचालकांवर जो अंकुश सरकारने राखायला हवा होता, तो तसा न राहिल्यामुळे, या लोकांनी मनमानीपणे बेधुंद कारभार केला. त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था दिशाहीन होत गेली. वर्षानुवर्षे हे चालत राहिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला तरुणवर्ग आता पेटून उठला आहे. त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर तो आता व्यवस्थेला प्रश्न विचारू लागला आहे. सुरुवात तर झाली आहे, बघूया यातून काय निष्पन्न होते ते….
गेल्या काही वर्षात शिक्षण व्यवस्थेत सुरु असलेली घसरण तरुणांच्या जीवावर उठली आहे. या सरकारच्या काळात शिक्षण व्यवस्थेला बाजारू स्वरूप आले आहे. विसाव्या शतकात परदेशातील मुले शिक्षणासाठी आपल्या देशात येत असत, त्याकाळी अनेक नामवंत विद्यापीठे आपल्या देशात होती, ती आजही आहेत,पण खाजगी विद्यापीठाच्या आक्रमणामुळे सध्या पडद्याआड झाकली गेली आहेत. आज नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हल्ली आपली मुले उच्च शिक्षणासाठी इंग्लंड,ऑस्ट्रेलिया,अमेरिका,
रशिया असे देश गाठू लागले आहेत. परदेशात जाणाऱ्या मुलांची आकडेवारी पाहिल्यास शिक्षणाचे हे चक्र उलट्या दिशेने कसे काय फिरले ? असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो.वास्तविक सरकारचे हे दारुण अपयश आहे, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक सरकारने शिक्षण व्यवस्थेकडे केलेले दुर्लक्ष, त्यास कारणीभूत ठरले आहे. शिक्षणात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने गेल्या आठ दशकात मोठ्याप्रमाणात निधी खर्च केला. पण त्याचे अपेक्षित परिणाम पाहायला मिळाले नाहीत. बेरोजगारी,दारिद्र,
गरिबी व वैफल्य,अशा संकटाच्या चक्रव्यूहात आपण सापडलो. सध्याच्या सरकारच्या एका तपाच्या काळात झालेल्या बाजारीकरणामुळे शिक्षण प्रचंड महाग झाले, त्याचबरोबर गुणवत्ताही लयाला गेली. शेतकरी,आदिवासी दलित व विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतात, त्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश कारणीभूत आहे. यावरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे सरकारने समाजात शिक्षण रुजवले नाही. त्यासाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम निर्माण करू शकले नाही. त्यामुळे आज तरुणवर्ग या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे पर्याय म्हणून पाहू लागले आहेत. त्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने निदान आता तरी आत्मपरीक्षण करावे…

