दीपक मोहिते,
उशिराने सुचलेले शहाणपणा,
जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग,
आपले शिक्षण धोरण व शिक्षणाचा अधिकार धाब्यावर बसवणाऱ्या सरकारने उशिराने का होईना एक चांगला निर्णय घेतला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही योजना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना नुकत्याच सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी, अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. राज्यात सध्या सुमारे १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. त्यातील अनेक अंगणवाड्या मोडक्या तोडक्या इमारतीत भाडे तत्वावर, पण अपुऱ्या सुविधांमध्ये सुरू आहे.
त्यामुळे आता ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. गावागावांमध्ये शाळा आणि अंगणवाडी वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे मुले आणि पालकांना अडचणी येत होत्या.
काही जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी अंगणवाड्या आणि शाळा एकमेकांपासून दूर आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी हा निर्णय लगेच लागू करणे, शक्य होणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. अंगणवाडीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळण्यांची जागा आणि लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आव्हान प्रशासनाने पेलले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
राज्यातील सुमारे ४२ हजार अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात आहेत. पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीचा वर्ग एकाच ठिकाणी असणे योग्य असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत, तेथे अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी नुकतेच माध्यमाना सांगितले.
ज्या शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणीच अंगणवाडी वर्ग स्थलांतरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक वातावरणावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू होणार आहेत.
रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शाळा आणि अंगणवाडी एकाच ठिकाणी आल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना फायदा होणार आहे.

