दीपक मोहिते,
विधान परिषद निवडणूक : भाजप – १२, शिवसेना – ०३ व राष्ट्रवादी काँग्रेस – ०२,
विधानपरिषदेच्या १७ जागासाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आला आहे. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की राज्यात आमची ताकद वाढली आहे, त्यामुळे आम्हाला ०७ जागा मिळाल्याच पाहिजेत.
या सर्व राजकीय घडामोडींवर बोलताना सरनाईक पुढे म्हणाले, विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे ०५ आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढली असल्यामुळे आम्ही ०७ जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेणार आहेत.शिंदे गटाला ३ जागाच देण्यात यावा, यासाठी भाजपमधील एका गटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आहे. तसेच फडणवीस देखील १२ जागांवर अडून बसले आहेत.
या प्रकरणी शिंदे गटाने आता कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याचे ठरवलं आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी आमची ताकद अधिक असतानाही आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली. ही तडजोडीची सल आजही पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा तोच प्रकार मान्य करण्यात येणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.पण मुख्यमंत्री फडणवीस त्यांना तीन पेक्षा अधिक जागा देतील असे वाटत नाही.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार भाजप – १२ जागा, शिवसेना – ०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस – ०२, असा होता. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालं असलं, तरी काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने थेट ७ जागांची मागणी केल्यामुळे वातावरण आता गढूळ झालं आहे.त्यामुळे जागावाटप कशाप्रकारे होते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या मागणीनंतर भाजपच्या नेत्यांनी आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत. पण भाजप १२ जागा कोणत्याही परिस्थितीत लढवण्याच्या तयारीला लागल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड- रत्नागिरी – सिंधुदुर्ग, हिंगोली – परभणी ( २ )
शिवसेना – ठाणे, नाशिक, यवतमाळ, ( ३ )
भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर ( १२ )
निवडणूक कार्यक्रम जाहीर,
अधिसूचना जारी : २५ मे रोजी,
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ०१ जून
अर्जाची छाननी : ०२ जून
अर्ज माघार – अंतिम तारीख : ४ जून
मतदान : १८ जून – स. ८.०० ते दु. ४.००,
मतमोजणी : २२ जून,

