दीपक मोहिते,
ज्योतीची ज्वाला होण्यास वेळ लागणार नाही…
देशाचे सरन्यायधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा उल्लेख ” झुरळ,” असा केल्यानंतर जे वादळ देशात घोंगावले, त्यावरून या देशातील तरुणांनी आपल्या दबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून दिल्याचे मानण्यात येते आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिजित दिपके या मराठवाड्यातील तरुणाने या प्रकरणी महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने सोशल मीडियावर ” कॉक्रेच जनता पार्टी,” नावाचे प्लॅटफॉर्म सुरू केले व देशभरातील राजकारण ढवळून निघाले. अवघ्या चार दिवसात एक्स, फेसबुक व इंस्टाग्राम या यावर त्यांच्या फॉलोअर्सनी अक्षरशः धुमाकूळ घातला. फॉलोअर्सची संख्या सुमारे १ कोटीच्या घरात गेल्यानंतर ” जेन झी, ” च्या चर्चेला उधाण आले व तरुणांच्या माध्यमातून बदल करण्याची चर्चा सुरू झाली. बघता बघता या प्लेटफॉर्मची वाटचाल राजकीय पक्षाच्या दिशेने सुरू झाली.दररोज लाखो तरुण, या पक्षाशी जोडले गेले व देश विदेशात अभिजित दिपके अवघ्या ७२ तासात नावारूपाला आला.आज देशातील तरुण विविध समस्या व प्रश्नामुळे हलाखीचे जीवन जगत आहे. अशावेळी सरन्यायधीशपदी असलेल्या सूर्यकांत यांनी तरुणांना डीवचण्याचे काम केले.तरुणांची तुलना झुरळा बरोबर केल्यानंतर मधमाश्यांचे पोळे फुटल्यानंतर जसे मोहोळ उठते, तसे झुरळाचे थवेच्या थवे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाहेर पडले व इतिहास निर्माण झाला. श्रीलंका व नेपाळ या दोन देशात ” जेन झी,” ने जशी राजकीय क्रांती केली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारतातील तरुण देखील प्रस्थापित व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारतील,असे वाटू लागले आहे. अर्थात यामध्ये तथ्य आहे, कारण आपला देश,बेरोजगारी,आर्थिक मंदी, गरिबी,महागाई,उद्योग,₹
कृषी
शिक्षण व सामाजिक सुरक्षितता आदी क्षेत्रात मोठ्याप्रमाणात₹ मागासलेला आहे. कोट्यवधी बेरोजगार सध्या विमनस्क स्थितीत सापडला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे, देशाची अर्थव्यवस्था मूठभर भांडवलदारांच्या हाती गेली आहे. कृषी क्षेत्राची वाताहत झाली आहे. केंद्र सरकार असून नसल्यासारखे आहे, मूठभर भांडवलदारांच्या हाती सत्तेचा लगाम असल्यामुळे केवळ श्रीमंतांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे तरुणवर्ग प्रचलित व्यवस्थेवर नाखूष आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने या तरुणांना झुरळ म्हणून डिवचले.त्यामुळे देशभरातील तरुण हे स्वतःहून झुरळ झाले व त्यांनी ” कॉक्रेच जनता पार्टी,” नावाचा राजकीय पक्ष जन्माला घातला. या पक्षाने सध्या अनेक राजकीय पक्षाची झोप उडवून दिली आहे.हे
तरुण अभिजित दिपके या सुशिक्षित तरुणाच्या नेतृत्वाखाली आता एकवटत आहेत.सध्या ही आग आज ज्योतीच्या स्वरूपात आहे. पुढील काळात तीची ज्वाला झाली, तर आपण आश्चर्य वाटून घेता काम नये.

