दीपक मोहिते,
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात १३८ टक्क्यांनी वाढ,मग देशात दररोज सरासरी ८० शेतकरी आत्महत्या का करताहेत ?
गेल्या १० वर्षाच्या मोदी सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीहुन अधिक वाढ झाल्याचा दावा निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केला आहे. हे उत्पन्न १३८ टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यायला हवी.
राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र व धोरण संशोधन केंद्राचे माजी संचालक रमेश चंद यांनी गेल्या १० वर्षात कृषी व संलग्न क्षेत्राने ४.४५ टक्के उत्पन्न वाढले व ही वाढ ऐतिहासिक अशी असून यापूर्वी कधीही इतकी वाढ झाली नव्हती, असा दावा केला आहे.ते पुढे म्हणतात,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा परिणाम करणारी ठरली. रमेश चंद यांच्या म्हणण्यानुसार २०१८ मध्ये केंद्र सरकारने एमएससपी ( किमान आधारभूत भाव )
ठरवण्याचे नवे सूत्र लागू केले. त्यामुळे उत्पादनवाढीच्या मार्गातील सारे अडथळे दूर झाले व मार्ग मोकळा झाला.सध्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी विकासदर सर्वाधिक आहे, असे स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वी चीन हा देश कृषी क्षेत्रात आघाडीवर होता, त्याला आपण मागे टाकले आहे.त्यामुळे रोम येथे अन्न व कृषी संघटनेच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२६ चा ” ऍग्रीकोला मेडल, ” बहाल करण्यात आले. हा सन्मान म्हणजे देशाच्या कृषी, अन्नसुरक्षा व गरिबी निर्मूलन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल, असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला, ही आम्हा देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पण या घडामोडीमुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.
रमेश चंद यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या एमएसपी धोरणामुळे हा बदल घडून आला, मग २०१८ साली केंद्र सरकारच्या धोरणाला लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुमारे वर्षभर प्रचंड आंदोलन का केले. या आंदोलनात सुमारे ९०० शेतकऱ्यांनी सरकारच्या दडपशाहीमुळे आपले देह का ठेवले ? आज देशात दररोज सरासरी ८० शेतकरी आत्महत्या का करतात ? सरकारच्या धोरणामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाली हे खरं असले तरी शेतकऱ्यांचे जीवनमानात बदल का होऊ शकला नाही ? आज महाराष्ट्रात कांदा,कापूस,सोयाबीन उत्पादक शेतकरी आपल्या शेतात अश्रू ढाळतोय, त्याच्या उत्पन्नाला किमान हमी भाव का मिळत नाही. या सर्व प्रश्नाची उत्तरे रमेश चंद यांनी दिली पाहिजेत.

