दीपक मोहिते,
आखाती देशातील युद्ध ; परिस्थिती हाताबाहेर चालली आहे,
इराण व अमेरिका / इस्त्रायल युद्धात आता युद्धविराम होण्याची शक्यता दुरावली आहे.दोन्ही बाजूकडून ताठर भूमिका सोडण्याची शक्यता नसल्यामुळे संपूर्ण जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलले जाणार आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या हट्टाला पेटले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता समझोता नाही,अशा निर्णयाप्रत ते आले आहेत,तर दुसरीकडे आम्ही उध्वस्त झालो तरी बेहत्तर, पण आम्ही शरण जाणार नाही,असे इराणने जाहीर केले आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे अवघे जग आता चिंतेत सापडले आहे.इराणने होर्मुझ खाडीतून होणारी तेलाची वाहतूक रोखल्यामुळे जगावर ऊर्जेचे संकट घोंगावू लागले आहे.या युद्धात नाटो संघटनेतील देशानी अलिप्ततावादी धोरण स्विकारल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ” युद्धानंतर तुम्हाला बघून घेऊ,” अशी रस्त्यावरची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे.इराण जोवर युरेनियम आमच्या स्वाधीन करत नाही,तोवर बोलणी नाही,असे त्यांनी जाहीर केले आहे.तर ” मृत्यू पत्करू, पण आमचे युरेनियम आम्ही अमेरिकेच्या ताब्यात देणार नाही,” अशी भूमिका इराणने दर्पोक्ती केली आहे.

हा तिढा लवकर सुटण्याची शक्यता नाही.त्यामुळे जगभरातील देशानी काटकसर करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यास तोंड देण्याची तयारी ठेवा,असे आवाहन केले आहे.इंधन दरवाढ,महागाई,
शेतमालाच्या निर्यातीला फटका व परकीय चलनाच्या गंगाजळीत होत असलेली घसरण,इ.कारणांमुळे आपली अर्थव्यवस्था सध्या दोलायमान स्थितीतून मार्गक्रमण करू लागली आहे.दरम्यान तेलाच्या किमतीत प्रति बॅरलमागे भरमसाठ ( प्रति बॅरल १११.८१ डॉलर ) वाढ झाल्यामुळे इंधनाचे दरही गगनाला पोहोचले आहेत.त्याचा परिणाम कृषी,परकीय चलन,गॅस व अन्य क्षेत्रावर जाणवू लागला आहे.आपण एकूण गरजेच्या सुमारे ८८ % कच्चे तेल आयात करतो.या तेलाची किंमत ३५ % नी वाढल्यामुळे येणाऱ्या काळात परकीय चलनाच्या गंगाजळीत ठणठणाट होण्याची शक्यता आहे.तसेच आपल्या देशातून तांदूळ,साखर,कांदा,केळी,द्राक्षे व अन्य जीवनावश्यक वस्तू निर्यात होत असतात.पण या युद्धामुळे वाहतुकीचे सारे मार्ग बंद तसेच अनेक देशातील बाजारपेठा बंद पडल्यामुळे आयात – निर्यात प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्याचा थेट फटका कृषी क्षेत्राला बसू लागला आहे.सागरी मार्गावर असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मालवाहतूक ठप्प झाली आहे.पुरवठा साखळी विस्कळीत होण्यामागे हे प्रमुख कारण असून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ कलमी उपाययोजना जाहीर केली आहे.तेल,खते, पेट्रोल व एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये,यासाठी सरकार आपल्या परीने आटोकाट प्रयत्न करत आहे.पण या प्रयत्नांना कितपत यश मिळेल,हे सांगणे कठीण आहे.

