दीपक मोहिते,
” आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे,”
मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
आगामी मान्सूनच्या लवकर आगमनाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे. यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. ” स्कायमेट,” ने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा आणि उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासा देणारी बातमी प्रसिद्ध झाली आहे. यंदाचा मान्सून अंदमानात वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान संस्था ” स्कायमेट,” च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या वातावरणामुळे मान्सून वेगाने अंदमान निकोबार बेटाच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे या बेटावर पावसाला लवकरच सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा वेग वाढला असून
हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,येत्या तीन ते चार दिवसात विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान अंदाजामुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी चालना मिळत आहे. यापूर्वी मान्सूनचे आगमन मेच्या तिसऱ्या आठवड्या दरम्यान होईल,असा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागानेही येत्या सात ते आठ दिवसात समुद्रात नैर्ऋत्य वारे सक्रिय होतील, असा दुजोरा दिला आहे.

पावसाचे आगमन वेळे आधी होत असले तरी त्याने मध्येच दडी मारता कामा नये, शेती बहरल्यानंतर अवकाळी व परतीच्या पावसाचा फटका बसता कामा नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात नोव्हें. व डिसें. महिन्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असतो. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास दरवर्षी हिरावला जातो.

