दीपक मोहिते,
सूर्यातीर,
ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
२०१४ साली केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने देशभरात रस्तेबांधणी,रेल्वे व अन्य पायाभूत सोयी- सुविधांवर ( उड्डाणपूल,मेट्रो,वेगवान रेल्वे व आता बुलेट ट्रेन ) लक्ष केंद्रित केले आहे. या काळात केंद्रीय रस्ते बांधणी व विकास खात्याची जबाबदारी पेलणाऱ्या नितीन गडकरी यांनी रस्त्याचे जाळे विणले. ग्रामीण भाग व शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी समृद्धी,द्रुतगती व कोस्टल रोड,इ. योजना राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना भरीव यश देखील प्राप्त झाले.त्यांचे मंत्रालय व राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम / रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे,नाशिक,अकोला यवतमाळ, नागपूर व अन्य शहरे एकमेकांशी जोडली गेली. एकेकाळी रस्ते व महामार्गाच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती होत असते,असे म्हंटले जात असे. पण रस्ते बांधणीच्या या धडक मोहिमेमुळे राज्याच्या ग्रामीण भागात किती उद्योगधंदे आले,याचा लेखाजोगा राज्यसरकारने कधीच मांडला नाही.

सरकारचा हा कार्यक्रम स्तुत्य जरी असला तरी ग्रामीण भागाला त्याचा किती फायदा झाला ? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरील पायवाटा आजही अंधारात चाचपडत आहेत. समृद्धी व द्रुतगती महामार्गावर गेल्या बारा वर्षात केंद्र व राज्यसरकारने अब्जावधी रु. ची उड्डाणे घेतली, पण ग्रामीण भागातील रस्तेबांधणी व नूतनीकरण या कामावर त्यांनी ३ % ही निधी खर्च केला नाही.
वास्तविक ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या योजनाबद्ध विकासामध्ये ग्रामीण भागातील रस्त्याचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. पण राज्यकर्त्यांनी आपल्या नियोजनात शहरी व ग्रामीण असा दुजाभाव केला. त्यामुळे ग्रामीण वाहतूक व्यवस्था ही कायम उपेक्षितच राहिली. त्याचा परिणाम कृषी,उद्योग,आरोग्य,
दळणवळण व शिक्षण या क्षेत्रावर चांगलाच जाणवला. आपल्या राज्यकर्त्यांचे लक्ष केवळ शहरी भागावर राहिल्यामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळू शकली नाही. वास्तविक आपल्या एकूण लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश लोकसंख्या ग्रामीण भागात आहे, तसेच राष्ट्रीय महसुलाचा ५० % हिस्सा ग्रामीण भागातून येत असतो. तरीही आपले सरकार ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेकडे लक्ष द्यायला तयार नाही. ग्रामीण भागाच्या नियोजनबद्ध विकासात ग्रामीण रस्ते सुधारणा याला अनन्यसाधारण महत्व आहे. कृषी उत्पादनात वाढ, सामाजिक – आर्थिक असमानता दूर करणे व ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक गाव एकात्मिक रस्त्याचे जाळे विणण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण भागातही रस्ते बांधणीचा धडक कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.

