दीपक मोहिते,
कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की नालेसफाई,रेल्वेचे कॅल्व्हर्टस,नैसर्गिक नाले,पावसाळी पाणी खाडीत जाण्यासाठी असलेल्या मार्गातील अडथळे दूर करणे, इ.कामाना महानगरपालिका प्रशासन प्राधान्य देत असते. पण,वसई,
नालासोपारा व नवघर – माणिकपूर ही तीन शहरे गेली अनेक वर्षे पाण्यात बुडत असतात. हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे तहहयात सुरूच आहे. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.खाड्या बुजवून जी बांधकामे उभारण्यात आली आहेत,ती या अस्मानी संकटाला आमंत्रण देणारी ठरली आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाली किंवा समुद्राला भरती आली की या उपप्रदेशात हाहाकार उडतो.

भरतीचे पाणी व पावसाळी पाणी अडते व संपूर्ण परिसर पाण्यात बुडतो. नायगाव खाडी परिसरात दलदलीच्या जागेत गेल्या दहा वर्षात हजारो बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे करताना कांदळवनाचीही सरसकट कत्तल करण्यात आली.त्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. बिल्डराच्या हिताला बाधा येत कामा नये,यासाठी मनपा अधिकारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कायम त्यांच्या पाठीशी असतात.नायगावच्या दलदलीमध्ये भराव करून ही सर्व बांधकामे उभारण्यात आली आहेत. पण महानगरपालिकेने अशा बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस कधीही दाखवले नाही. त्यामुळे यंदाही या शहरातील नागरिकांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.जोवर पाणी वाहून नेणाऱ्या मार्गातील बांधकामे हटवण्यात येणार नाहीत,तोवर येथील नागरिकांना दरवर्षी या अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार आहे आणि आजच्या घडीला ही बांधकामे हटवणे,कोणालाच शक्य होणार नाही.

कितीही नालेसफाई करा, पण जोवर पावसाळी पाणी जाणाऱ्या मार्गातील अडथळे दूर होणार नाहीत, तोवर येथील नागरिकांना किमान तीन दिवस पाण्यात दिवस काढावे लागणार आहेत. दरवर्षी परिसर जलमय होणे, हे आता येथील करदात्यांच्या पाचवीला पुजले आहे.राज्याच्या ग्रामीण भागाच्या नशिबी जसा कुपोषणाचा शाप लागला आहे,तसाच परिसर जलमय होण्याचा शाप येथील करदात्यांच्या नशिबी कायमचा लागला आहे.त्यामुळे नागरिकांनी यंदाही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.

