दीपक मोहिते,
सोशल मीडिया शाप की वरदान ?
देशातील महत्वाच्या निवडणुका गेल्या वर्षभरात पार पडल्या. गेले वर्षभर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील पुढील निवडणुकापर्यंत आता थंडावल्या आहेत. एकमेकांच्या उखाळ्या – पाखाळ्या ऐकण्यात आपले आपले वर्ष कधी निघून गेले, ते कळले देखील नाही. या निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया, हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते मनापासून स्विकारले आहे. पूर्वी पक्षांची मुख्यालये, ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत, आता त्याची जागा सोशल मीडियाच्या
वॉररुमने घेतली आहे. या वॉररुम आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत.
” होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते,” कसं होत, हे या सोशल मीडियाने करून दाखवले. बदनामी, चिखलफेक, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे, या गैरप्रकाराला या माध्यमाने राजाश्रय मिळवून दिला. यापूर्वी आपण सकाळी चहाचे घोट घेत दैनिकांची पाने चाळत असू, आता रामप्रहरी फेसबुक, व्हाटसअप, ट्विटर व इंस्टाग्राम ओपन करतो. त्यासुमारास नेट बंद, नेटवर्क नसणे किंवा नेटची गती धिमी असल्यास,आपला जीव कासावीस होत असतो. अशावेळी आपण मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना लाखोली वाहतो. आता हे सारे नित्याचेच झाले आहे, कारण आपण सोशल मीडियाच्या इतके आहारी गेलो आहोत कि, एकवेळ जेवण उशिराने करू, पण ही सारी सोशल मिडीया साईट्स वेळेवर पहायाला मिळायला हवीत, असा आपला अट्टाहास असतो. किंबहुना आपली तशी मानसिकताच आता तयार झाली आहे. दुर्देवाने या वावटळीत समाजातील सर्व घटक सापडले आहेत. त्यामध्ये लहान मुले, तरुण, तरुणी, महिला, वयोवृद्ध व्यक्ती,या सर्वांचा समावेश आहे. कालांतराने हे माध्यम मानवाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सरकारने अशा साईटवरून बदनामी, तसेच गुन्हे करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सायबरसेलची निर्मिती केली, परंतु दुर्देवाने हा सेल प्रभावी ठरू शकला नाही. त्यामुळे येणारा काळ अत्यंत खडतर असा आहे.
सन २०१४ साली निवडणुकीत भाजपने काँग्रेसची बदनामी करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला जबर फटका बसला व भाजप सत्तेत विराजमान झाले. पण हेच माध्यम आता भाजपच्या जीवावर उठले आहे. कारण ते आता बुमरॅग होऊन त्यांच्यावरच उलटले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याही पंतप्रधानांची बदनामी झाली नसेल ती तेवढी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होत आहे. जे ” पेरले तेच उगवते,” हे एकप्रकारे सिद्ध झाले. भाजपने केले काय ? किंवा इतरांनी केले काय ? हा प्रकारच मुळात गैर असून त्यावर निर्बंध आले पाहिजेत. आज सोशल मीडियावरून ” फेकू, पप्पू,” हे जे काही चालले आहे, त्यामुळे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा चेहरा विद्रुप होत चालला आहे. दुर्देवाने यामध्ये आपली सुरक्षा व्यवस्थाही अशा गैरप्रकारामुळे अधूनमधून अडचणीत येत असते. कोणत्याही साधनांचा सकारात्मक वापर व्हायला हवा, परंतु त्याचा आता सर्वानाच विसर पडत चालला आहे. सोशल मीडियाने जगभरात जो धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे अनेक देश आता त्यावर बंदी आणण्यासंदर्भात विचार करू लागले आहेत. पण ते शक्य होणार नाही, कारण सोशल मिडिया आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्याचा सकारात्मक वापर ण झाल्यास भविष्यात ते आपल्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

