दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
मिशन लोटस पुन्हा सक्रिय,
राजकारणात कोणी कोणाच नसतं, हे नुकत्याच घडलेल्या घडामोडीवरून सिद्ध झाले आहे. गेल्या आठ दशकात भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतरे आपण पाहिली. केवळ स्थित्यंतरेच नव्हे तर स्वार्थी राजकारणामुळे कुटुंबेच्या कुटुंबे कशी फुटली हे देखील आपण अनुभवले. त्यामुळे भारतीय राजकारणात आता स्वार्थीपणाला अक्षरशः उत आला आहे. राजकारणात एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी होत आहे, त्याचा जनतेत बोलबाला वाढत चालला आहे, हे दिसायला लागले की त्याचे पंख कापण्याचे षडयंत्र सुरू होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून या प्रक्रियेला वेग आला व आज या प्रक्रियेला राजमान्यता मिळाली आहे.
भाजप सत्तेत आल्यापासून त्यांनी अशा आयाराम – गयारामाना चांगलाच राजाश्रय मिळवून दिला व पक्षांतर कायद्याचा पार चोळामोळा करून टाकला. आज पक्षात असलेला खासदार व आमदार, उद्या कुठे असेल ? याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. भारतीय राजकारणाला फुटीचे जे ग्रहण लागले आहे, त्यामागे केवळ स्वार्थ ( मला काहीतरी मिळाले पाहिजे,) व माझ्याशिवाय सार्वजनिक जीवनात अन्य कोणी मोठा होता कामा नये, असा आपमतलबी विचार रुजला आहे. त्यामुळे सध्या दिवसागणिक फुटीच्या घटना घडू लागल्या आहेत. पक्षांतर कायद्यातील पळवाटा शोधून अनेक जण आता माकडउड्या मारू लागले आहेत. काल आम आदमी पार्टीचे खा.राघव चढ्ढा,खा. हरभजनसिंग व खा.अशोक मित्तल हे तिघे काल भाजपमध्ये सामील झाले. तर इतर चारजण त्याच मार्गावर आहेत. एकूण १० खासदारांपैकी ७ जणांनी आपची साथ सोडली आहे. त्यांची ही संख्या दोन तृतीयांश इतकी असल्यामुळे पक्षांतर कायद्यातील तरतुदीचा भंग झालेला नाही.अतिशय पद्धतशीरपणे तसेच नियोजनबद्ध आखणी करून या फुटीर खासदारानी पक्षांतर केले आहे. अर्थात यामागे भाजपचे धुरीण आहेत,हे काही लपून राहिलेले नाही.आपला दिल्लीच्या सत्तेतून पायउतार करायला लावल्यानंतर भाजपने आता आपच्या ताब्यात असलेले पंजाब काबीज करण्यासाठी हे ” मिशन लोटस,” राबवले आहे. चड्ढा याना राज्यसभेत पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची निवड करण्यात आली होती. ही निवड होताच अशोक मित्तल व त्यांच्या मुलाच्या घरी व उद्योगसमूहावर ईडीच्या धाडी पडल्या. या धाडीनंतर आपच्या या खासदारांचे धाबे दणाणले व त्यांनी भाजपचा तंबू गाठला. त्यामुळे भाजप आता पंजाबमध्येही मिशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब राज्याची संपूर्ण जबाबदारी राघव चड्ढा यांच्यावर सोपवली होती. राघव चड्ढा यांनी ती यशस्वीपणे पेलली देखील,पण पंजाबचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी, राघव चड्ढा हे समांतर सरकार चालवत असल्याच्या तक्रारी केल्या.त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांच्याकडून पदभार काढून घेतला.त्यांना देण्यात आलेला सरकारी बंगला देखील सोडण्यास सांगण्यात आले.या सर्व घडामोडीनंतर आता फुटीर खासदारांनी पक्ष भ्रष्ट नेत्यांच्या हाती गेल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तर आपने हे सात खासदार ईडीच्या भितीमुळे पक्षापासून दूर गेल्याचे म्हंटले आहे.

