दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
युद्ध थांबण्यात जगाचे हित आहे…
सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोविड – १९ या जीवघेण्या रोगाने संपूर्ण जगाचे होत्याचे नव्हते केले होते. त्या अस्मानी संकटाला जगाने यशस्वीपणे तोंड दिले.पण अवघ्या दोन वर्षांच्या काळात किमान ५ लाख लोक मृत्युमुखी पडले.हे संकट मानवनिर्मित होते की निसर्गनिर्मित हे आजही गुलदस्त्यातच आहे.
सध्या जे संकट जगावर घोंगावू लागले आहे,ते मात्र मानवनिर्मितच आहे. अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध, हे जगाला वेठीस धरू पाहत आहे. या युद्धामुळे जगभरात तेल व नैसर्गिक वायूची होऊ घातलेल्या टंचाईने जगातील सर्वच देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आखाती देशातून येणारे तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक ठप्प आता होण्याच्या मार्गावर आहे. आखतातून येणाऱ्या उत्पादनाची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतुन होत असते. हा भाग इराणच्या ताब्यात आहे. या युद्धामुळे इराणने हा मार्ग बंद करण्याचे जाहीर केले आहे. इराणने नुकतेच ओमान या तेलउत्पादक देशाच्या सलालह बंदरातील तेलसाठ्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यामुळे भारतीय तेलवाहू जहाजही अडकून पडले होते. या हल्ल्यामुळे लाखो बॅरल तेल जळून खाक झाले. त्यामुळे अवघे जग स्तब्ध झाले,आपल्यापुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे,याची चुणूक या घटनेने त्यांना
मिळाली. होर्मुझ सामुद्रधुनीतुन तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरवर जर अशाप्रकारे हल्ले सुरू झाले तर जगातील अनेक देशात तेल व गॅसची टंचाई निर्माण होऊन मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत व्यापारी लोक मड्याच्या टाळूवरील लोणी ओरबडण्याच्या कामाला लागतील. अनेक हॉटेलवाले आतापासूनच ” चुलीवरचे जेवण ,” अशी हाकाटी देऊ लागले आहेत. या हॉटेलवाल्यानी ” चुलीवरचे जेवण,” या गोंडस नावाखाली पदार्थाचे दर देखील वाढवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशात पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅसचा विपुल प्रमाणात साठा असल्याचे सरकार वारंवार सांगत आहे. पण सतत पसरत असलेल्या अफवामुळे पेट्रोल पंप व गॅस एजन्सीच्या कार्यालयावर प्रचंड रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. हे युद्ध जगाला संकटाच्या खाईत ढकलणारे आहे. जर का हे युद्ध वेळीच थांबले नाहीतर जगात हाहाकार उडेल व कोरोनानंतर पुन्हा लोकांना उपासमारीमुळे आपले जीव गमवावे लागतील. तशी वेळ जगावर येऊ नये,यासाठी या युद्धखोर तीन देशानी हे युद्ध थांबवायला हवे. युद्धामुळे आजवर कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत, तर आजवर झालेल्या युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था मोडीत निघाली आहे. हे युद्ध तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्यापूर्वी ते आवरते घेण्यातच सर्वांचे हित आहे.

