दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
युद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार,
अमेरिका व इस्त्रायल यानी दोन दिवसापासून इराणची राजधानी तेहरानवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी, त्यांचे नातेवाईक व अनेक ज्येष्ठ मंत्री यांचा खात्मा झाला. इराण, अणू कार्यक्रम राबवत असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीने हे हल्ले केले, असे भासवण्यात येत असले तरी त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. अमेरिकेचा आखाती देशात असलेल्या तेलसाठ्यावर आपला कब्जा राहावा,यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेची इराक, इराण, सिरिया, अफगाणिस्तान, येमेन या तेलसंपन्न राष्ट्रावर वक्रदृष्टी आहे. सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी व दुबई या देशांनी अमेरिकेशी मिळते जुळते घेतल्यामुळे आजच्या घडीला हे सारे देश सुरक्षित आहेत. इराण हा कट्टर इस्लामिक देश असून या देशाने अमेरिकेच्या दादागिरीला कधीही भीक घातली नाही. इराण आपले तेल हे रशियाला विकू लागला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रॅम्प यांचे पित्त खवळले, त्यांनी इस्त्रायल या देशाशी हातमिळवणी करून इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्लॅन आखला. इस्त्रायलला इराणपासून धोका असल्यामुळे इस्त्रायलने अमेरिकेला साथ दिली. ट्रम्प यांनी कोणत्याही देशाने इराणकडून तेल खरेदी करू नये, अशी तंबी दिल्यामुळे अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली, त्यामध्ये आपलाही समावेश होता. पण, ट्रम्प यांना तेही मान्य नव्हते. त्यांचे धमकावणे सुरूच ठेवले होते. आपल्या सरकारनेही रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली होती. त्यामुळे ट्रम्प यांचा संताप झाला व त्यांनी आपल्या विरुद्ध टॅरिफचे हत्यार उपसले. त्यामुळे जागतिक पातळीवर आपली आर्थिक कोंडी होणार, अशा भितीमुळे आपल्या सरकारने ट्रम्पच्या दादागिरी समोर नमते घेतले. ट्रम्प हे अत्यंत भडक माथ्याचे व्यक्तिमत्व असल्यामुळे पंतप्रधान मोदी ट्रम्पच्या सर्व अटी व शर्ती बिनभोभाटपणे मान्य करत असतात. ऐन युद्धाच्या वेळी मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले. वास्तविक युद्ध सुरु असताना कोणताही राष्ट्रप्रमुख त्या देशात जात नाही. पण आपले पंतप्रधान दोन दिवस इस्त्रायलमध्ये मुक्कामाला होते. यावरून मोदी यांच्यावर भितीचे किती सावट होते, हे स्पष्ट होते.
अमेरिका,इस्त्रायल व इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या या युद्धाने सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे.इराणने मध्यपूर्वेतील देशात असलेल्या अनेक मुस्लिम राष्ट्रातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले चढवले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने इस्त्रालयच्या अनेक शहराना लक्ष्य केले. या हल्ल्याचा परिणाम भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलदेखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या ४५ ठिकाणांवर हल्ला केला आहे.त्यात अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४०० इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून १३०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पण इराणवर अमेरिका आणि इस्रायल इतके पेटून का उठले ?
इराणवरील हल्ल्यामागची नेमकी कारणे काय आहेत ? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर खाली दिले आहे.
२०२५ मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जाने.मध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा विस्तार करू देणार नाही. परंतु, इराणने अशा कोणत्याही धमक्याना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर जोरदार हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
हे युद्ध अधिक लांबल्यास पुरवठा व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक काळ चालल्यास ही व्यवस्था दीर्घकाळ विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होईल व किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलेच परिणाम होतील.जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. तसेच, येणाऱ्या काळात बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

