दीपक मोहिते,
आमचा अभिमान
मराठी टिकली, तरच महाराष्ट्र टिकेल,
आज मराठी भाषा गौरव दिन,त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी २७ फेब्रु. रोजी मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी,लेखक व नाटककार वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांच्या जन्मदिनी तो साजरा केला जातो.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या दिवसापासून ” राजभाषा मराठी दिन,” तर २७ फेब्रु.रोजी ” मराठी भाषा गौरव दिन,” साजरा होत असतो. २१ मे २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने हा दिन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचा निर्णय घेतला व तो नित्यनेमाने साजरा होऊ लागला. नव्या पिढीला मराठी भाषेचा अभिमान वाटावा, सध्याच्या डिजिटल युगात मराठी भाषेचा वापर वाढावा व सांस्कृतिक वारसा जपण्यात यावा,असा उद्देश बाळगून दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या दिवशी शाळा व महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, निबंध लेखन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ” मराठी टिकली, तरच महाराष्ट्र टिकेल,” अशी या उपक्रमाची थीम ठरवून आपण हा दिन साजरा करत असतो. मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रसारासाठी असे उपक्रम कारणी लागत असतात. त्यामुळे मराठी साहित्य,संस्कृती व परंपरा याचा जागर होतो.
अशा या समृद्ध मराठी भाषेला ३ ऑक्टो.२०२४ रोजी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. वर्षानुवर्षे खितपत पडलेली महाराष्ट्राची मागणी एकदाची मार्गी लागली. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मराठीला प्रतिष्ठित दर्जा मिळाला. त्यामुळे मराठी ही देशातील ११ वी अभिजात भाषा ठरली आहे. अनेक जटील निकष पूर्ण केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. यामध्ये महत्वाचा निकष काय होता ,त्यावर एक नजर टाकूया.
भाषा पंधराशे ते दोन वर्षे जुनी असणे व तिचे स्वतंत्र
प्राचीन साहित्य असायला हवे. हे सारे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला व केंद्र सरकारला सादर केला. तो मोदी सरकारने स्विकारला, अशाप्रकारे आपल्या मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण सारे जागतिक मराठी भाषा दिन साजरा करत आहोत.

