दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
येणाऱ्या काळात भाजप, ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत पाहायला मिळणार,
गेल्या वर्षी लोकसभा, यंदा विधानसभा व १२ स्था. स्व. संस्था व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे महायुतीने या तिन्ही निवडणुकांमध्ये बाजी मारली.महायुतीमधील प्रमुख घटक असलेल्या भाजपने चौफेर कामगिरी करत आपल्या मित्रपक्षाच्या छातीतही धडकी भरवली.या निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश हे ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत यायला पुरेसे आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणारे भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या. मात्र, भाजप वगळता अजित पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप आता उदयाला आला आहे. या निवडणुकीतील निकालाची बारकाईने पडताळणी केली असता भाजपने शहरी भागासह ग्रामीण भागातही भक्कम पाय रोवल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्वतःला दादा समजणारे स्व. अजित पवार यांच्या गटाचे चांगलेच पानिपत झाले. उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिंदे गटासह विरोधी पक्षाची भाजप समोर डाळ शिजली नाही. या तिन्ही निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वत्र भाजपचा बोलबाला राहिला.
लवकरच उर्वरित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजप आता कामाला लागला आहे, तर दुसरीकडे अजित पवार गट सध्या पार विस्कळीत झाला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.पक्षातील अंतर्गत कलह व सुंदोपसंदी लक्षात घेता,पक्ष या निवडणुकीला कितपत सामोरे जाईल, याविषयी साशंकता आहे.त्यांच्या पक्षातील एका गटाला सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य नाही,पण त्यास उघडपणे विरोध करण्याची हिम्मत या गटाकडे नाही.अजित पवार यांच्या अकाली निधनामुले त्यांच्या गटाची भाजपला फारशी गरज उरलेली नाही.आज भाजप व संघाचे काही नेते ” सुंठीवाचून खोकला गेला.” अशा आविर्भावात वागू लागले आहेत. तसेच दुसरीकडे एकनाथ शिंदे गटासमोर अडचणी निर्माण करण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, हे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या भूखंडाच्या भानगडी व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढू लागली आहेत. त्यांच्यामध्ये सुरू असलेला वाद हा शिंदे यांची जनमानसात असलेली प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. गणेश नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस आहे, हे आता लपून राहिलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडली,ही स्वप्नेच त्यांच्या मुळावर आली आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे,ते मोडून काढण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सध्या कामाला लागले आहेत. ठाणे व नवी मुंबईतील भूखंडाचे श्रीखंड खाण्याची त्यांची प्रकरणे नाईक एकामागोमाग बाहेर काढू लागले आहेत. ही सारी प्रकरणे नगरविकास खात्याशी संबधित आहेत. हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गणेश नाईक यांच्या सततच्या आरोपामुळे शिंदे गटात सध्या फार अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्यामुळे शिंदे यांचे चिरंजीव खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर नुकतीच आगपाखड केली होती.त्यांच्या पक्षाचे खा. नरेश म्हस्के,आ.संजय शिरसाठ,मंत्री शंभूराजे देसाई यांनीही नाईक यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.तर भाजपचे ठाण्याचे आ. संजय केळकर यांनी ” गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपाला शिंदे गटाने उत्तर द्यायला हवे, कारण त्यांचे सर्व आरोप हे नगरविकास विभागाशी संबधित आहेत,व हे खाते तुमच्याकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाने उत्तर द्यायला हवे,” अशी भूमिका जाहीरपणे मांडली. या सर्व घडामोडी लक्षात घेता भाजपला आता एकनाथ शिंदे यांची संगत नकोशी झाल्याचे स्पष्ट होत आहे. अजित पवार यांचे अकाली निधन, हे भाजपच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे. भाजपची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पवार गटाला महायुतीमध्ये घेणे,कधीही मान्य नव्हते. त्यामुळे त्यांचे मुखपत्र असलेल्या ” ऑगनायझर,” ने याविषयी सविस्तर लेख लिहून नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप भविष्यात ” एकला चलो रे,” भूमिकेत आला तर आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.

