दीपक मोहिते,
न्यूजलाईन, ( नॅशनल डेस्क )
भारत – बांगला देश ; संघर्षाचे पर्व संपुष्ठात येण्याची शक्यता,
बांगला देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगला नॅशनल पार्टीने ( बीएनपी ) ३०० पैकी २०४ जागा जिंकत कट्टरवादी जमात – ए – इस्लामी या पक्षाला रोखण्यात यश मिळवले. या पक्षाला केवळ ७६ जागा जिंकता आल्या. उर्वरित १० जागा इतर पक्षानी जिंकल्या आहेत.
त्यांच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावी पंतप्रधान तारिक रहमान यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिद झिया यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्यावर भ्रष्टाचार व गुन्हेगारीचे अनेक आरोप झाले होते.ते गेली अनेक भितीपोटी परदेशात वास्तव्याला होते. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर त्यांच्यावर असलेले गुन्हे मागे घेण्यात आले. त्यानंतर तब्बल अठरा वर्षानंतर आपल्या देशात परतले. महंमद युनूस यांच्या अंतरीम सरकारच्या काळात म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून भारत – बांगला देशाचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत.माजी पंतप्रधान हसीना शेख यांना भारतात आश्रय देण्यात आल्यामुळे त्या देशात भारतविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यात हिंदू लोकांची घरे जाळणे,हत्या करणे तसेच बलात्काराच्या घटना, याला अक्षरशः उत आला होता. माजी राष्ट्राध्यक्ष मुजीबुर रहमान व त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या हसीना शेख यांचे पाठीराखे राहिल्यामुळे बांगला नॅशनल पार्टी व कट्टर विचारसरणी असलेला जमात – ए – इस्लामी यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. या दोघांना चीन व पाकिस्तानने सतत खतपाणी घातले. त्यामुळे निवडून आल्यानंतर तारिक रहमान भारताबाबत काय भूमिका घेतात ? याकडे भारताचे बारकाईने लक्ष होते. शेख हसीना यांनी उल्फा व अन्य अतिरेकी संघटनांना आपल्या देशात कधीही थारा दिला नाही. त्यामुळे ईशान्य भारतात गेली अनेक वर्षे शांतता नांदली. त्याबदल्यात भारताने बांगला देशाला भरीव आर्थिक मदत दिली.दोन वर्षांपूर्वी शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर युनूस महंमद यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. युनूस महंमद यांची ओळख भारताचे मित्र, अशी असताना त्यांनी सत्तेत येताच भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानशी जवळीक साधली. त्यांच्या एकूण वागण्यावरून त्यांना भारत व बांगलादेश दरम्यान चांगले संबंध राहावेत, असे वाटत नव्हते, हे उघड झाले. बांगला देशात निवडणुका होऊच नयेत,यासाठी ते प्रयत्नशील होते.एकेकाळी भारताचे कट्टर विरोधक, अशी ओळख असलेले तारिक रहमान यांनी आता मात्र भारताशी जुळवून घेण्याची तयारी चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर याना त्यांनी तारिक रहमान यांची भेट घेण्यासाठी बांगला देशात पाठवले आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगने मात्र या निवडणुकीत भाग घेतला नाही.त्याचा फायदा बांगला नॅशनल पार्टीला झाला व जमाते-ए- इस्लामी पक्षाला रोखण्यात तारिक रहमान ते यशस्वी झाले. त्यांच्या सरकारची वाटचाल भविष्यात कशी असेल ? हे सांगणे कठीण असले तरी त्यांना भारताशी पंगा घेणे परवडणार नाही.

