दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
सत्तेचा स्वार्थ आणि मराठी अस्मिता,
मराठी माणसाचे हित व अस्मितेसाठी एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांची तोंडे आता एकमेकांच्या विरोधात वळू लागली आहेत. हे दोघे, निवडणुकीपूर्वी जो उद्देश उराशी बाळगून एकत्र आले,त्या उद्देशालाच या दोघांनी हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे त्यांना आता मराठी माणूस,मराठी भाषा व मराठी अस्मिता हा अजेंडा वापरता येणार नाही.
मनसेने निवडणुकीचे निकाल लागताच भाजपला रोखण्यासाठी कल्याणमध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर चंद्रपूर येथे शिवसेनेने ( उबाठा ) भाजपला पाठिंबा देत उट्टे काढले. या दोन्ही घडामोडीवरून एकच निष्कर्ष निघतो,तो म्हणजे राज व उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू, हे मराठी माणसाचे हित व मराठी भाषा व अस्मिता, यासाठी एकत्र आले नव्हते तर केवळ सत्तेसाठीच एकत्र आले होते. चंद्रपूर येथे गेल्या दोन दिवसात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या,त्यावर राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना शिवतीर्थावर धाव घ्यावी लागली. त्यांनी राज यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली.या चर्चेत काय ठरले,हे यथावकाश उघड होईलच.पण,या दोघांनी ” कोण चुकलं,” याचा शोध घेणे,मुळात चुकीचे ठरेल. तसेच राज यांनी चंद्रपूर प्रकरणावरून आगपाखड करणे, ही बाबच मुळात न्यायाला धरून नाही. आपण जे कल्याणमध्ये केलं, तेच उद्धव ठाकरे यांनी चंद्रपुरात केले. त्यामुळे राज यांचा थयथयाट, हा संयुक्तिक नाही.त्याचे वर्णन करायचे झाल्यास ” मी सांगतो एकाला,आणि शेंबुड माझ्या नाकाला,”असेच करावे लागेल. या दोघांचे एकत्र येणे, हे केवळ सत्ता मिळवण्यासाठीच होतं, हे आता लपून राहिलेले नाही. मराठी माणूस, मराठी भाषा व अस्मिता,हे सारे थोतांड होते,त्याचा वापर केवळ सत्ता मिळवण्यासाठीच करण्यात आला. त्यामुळे या दोघांना मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक सह राज्यातील अनेक महानगरात मराठी माणसाने पार झिडकारले.

