दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,” ( नॅशनल डेस्क )
लोकशाहीच्या मंदिरात पंतप्रधान असुरक्षित कसे ?
चीनकडून लडाख परिसरात होणारी घुसखोरी व मोदी सरकारचे होत असलेले दुर्लक्ष,यावरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्याची पाळी आली तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातून पळ काढला.त्यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या पंतप्रधानांना पाठीशी घालताना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.मोदी यांची पाठराखण करताना ओम बिर्ला यांनी मोदी यांच्या जीवाला धोका असल्यामुळे,मी त्यांना आज सभागृहात येऊ नका, अशी सूचना केल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घालत सभात्याग केला. या सर्व घडामोडीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दोन प्रश्न उभे राहीले आहेत. देशाचे पंतप्रधान हे लोकशाहीच्या मंदिरात असुरक्षित कसे आणि सभागृहात जर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो,तर सभापती म्हणून ओम बिर्ला यांची जबाबदारी नाही का ? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे सभापती ओम बिर्ला यांनी द्यायला हवीत.जर सभागृहात एखाद्या अतिमहत्वाच्या सदस्याच्या जीवाला धोका होऊ शकतो.याचा अर्थ कसा लावायचा ? जर देशाचे पंतप्रधान जर असुरक्षित आहेत,तर सर्वसामान्य माणसाचे काय ?
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर आजवर अब्जावधी रु.खर्च करण्यात येत असतात.त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना अत्याधुनिक सुरक्षा देण्यात आली आहे.तसेच आठ हजार कोटी रु.चे विमान त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.अशा पंतप्रधानांना विरोधी पक्षाच्या महिला खासदाराकडून धोका असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्पतीच्या अभिभाषणावर उत्तर न देता पळ काढला.हे देशाच्या संसदीय इतिहासात प्रथमच घडले आहे. ५६ इंचची छाती व ” वोह एक मारेंगे, तो हम दस मारेंगे,” असे छाती बडवत सांगणारे आपले पंतप्रधान महिला खासदारांच्या घेरावाला घाबरतात,” यह बात कुछ हजम नही हुई,” असेच म्हणावे लागेल.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी चीनच्या आक्रमणासंदर्भात माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या ” फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी,” या त्यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी कशी जबाबदारी टाळली,हे दाखवून दिले.त्यामुळे भाजपचे अमित शहा,राजनाथसिंह,किरन रिजिजू हे मंत्री व खा.निशिकांत दुबे यांनी सभागृहात गोंधळ घालत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही.तर सभापती ओम बिर्ला यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडवत या मंडळींना अप्रत्यक्षपणे साथ दिली.यावरून एक सिद्ध झाले आहे की विरोधी पक्षाच्या प्रखर हल्ल्याना तोंड देण्याचे धाडस मोदी यांच्याकडे नाही.

