दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या ” आईचा घो,”
आपल्या शिक्षण व्यवस्थेत किती सावळागोंधळ आहे,हे एका मान्यताप्राप्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या खालवणे व शाळा बंद पडणे,हे प्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आता तिसरी धक्कादायक बाब ” यु डायस प्लस,” संस्थेच्या अहवालातून उघड झाली आहे.राज्यातील एकूण ३ हजार शाळेत गेली अनेक वर्षे विजेचा पत्ताच नाही.तसेच देशभरात विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊन ती आता २४.८ कोटींवर आली आहे.पण दुसरीकडे शिक्षकांची संख्या मात्र १ कोटी वर गेली आहे.
सन २०१८- २२ दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या २६.३६ कोटी इतकी होती.त्यामध्ये १.५५ कोटीने घट होऊन २४.८१ कोटीवर आली आहे.विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घसरण होत असताना दुसरीकडे शिक्षकांच्या संख्येत मात्र ६.७ % नी वाढ झाली आहे.यामागचे सरकारचे काय गणित आहे, याचा उलगडा होत नाही।
तसेच राज्यातील सरकारी,अनुदानित विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत अशा एकूण ३ हजार ३२८ शाळांमध्ये विजेच्या जोडण्या नसल्यामुळे त्या अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ३ हजार १०२ सरकारी,अनुदानित – १३१,विनाअनुदानित -१९ व स्वयंअर्थसहाय्यित – ७६ शाळांचा समावेश आहे.तसेच २ हजार ५५ मुलांसाठी तर १ हजार १६४ शाळांमध्ये स्वतंत्र असे एकही स्वच्छतागृह नाही. तर १९ शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही,पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.आपले सरकार मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालने व निवासस्थानाच्या अंतर्गत सजावटीवर दरवर्षी हजारो कोटी रु.खर्च करत असते.तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र अशाप्रकारचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

