दीपक मोहिते,
न्यूजलाइन ( नॅशनल डेस्क ) भाग क्र. १,
अखेर आपले विश्वगुरु हे जगदगुरु समोर झुकले..
अनेक वर्षे रखडलेला व अमेरिका – भारत दरम्यान होऊ घातलेला व्यापार करार अखेर मार्गी लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः भाईगिरी करत आपल्याला नाक घासत शरण यायला भाग पाडले आहे. या व्यापार कराराला मूर्तस्वरूप देण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत,कृषी व आर्थिक क्षेत्रात कधीही तडजोड करणार नाही,असे छातीठोकपणे सांगत होते. पण, प्रत्यक्षात ते ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घालत होते. ट्रम्प यांनी रशियाकडून तेलखरेदी व अमेरिकी मालावर झिरो शुल्क, या दोन जाचक अटी मोदी यांना मान्य करायला लावल्या. त्या बदल्यात अमेरिकेने भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूवरील आयात शुल्क २५ % वरून १८ % पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशात सुरु असलेल्या व्यापार युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. ५६ इंचवाल्या आपल्या पंतप्रधानांना ट्रम्प यांनी या युद्धात अक्षरशः धुळीत लोळवले.
रशियाकडून तेलखरेदी बंद केल्यानंतर भारताने अमेरिका व व्हेनेझुएला या दोघांकडून खरेदी करावी, अशी अट घालण्यास ट्रम्प काका विसरले नाहीत. ट्रम्प यांची ही जाचक अट देखील आपल्या विश्वगुरूंनी मान्य करून टाकली.अमेरिका आता दरवर्षी ५०० अब्ज डॉलर्सचा माल निर्यात करणार आहे. या अमेरिकन मालावर आपल्याला कोणतेही आयात शुल्क आकरता येणार नाही. तर दुसरीकडे अमेरिका आपल्या निर्यात मालावर १८ % आयात शुल्क आकारणार आहे. हा आतबट्ट्याचा व्यापारी करार असून आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे अर्थतज्ञाचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या ५०० अब्ज डॉलर्सच्या निर्यात मालामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश आहे. या मालाचा आपल्या कृषी बाजारावर मोठा परिणाम होणार आहे.देशातील लाखो शेतकरी आपल्या शेतमालाला किमान हमी भाव मिळावा, म्हणून गेली अनेक वर्षे जिवाच्या आकांताने आंदोलने करत आहेत. चार वर्षांपूर्वी देशाच्या राजधानीमध्ये थंडीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांनी आपले देह ठेवले. आज तेच सरकार ट्रम्प यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या जाचक अटी मान्य करत सुटले आहे.
क्रमशः

