दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
सरकार इतकं घाबरतंय कशासाठी ?
गेल्या दोन दिवसापासून लोकसभेत प्रचंड गोंधळ होत असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत – चीन सीमेवर घडलेली घटना आणि माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिलेले ” फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी,” या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पित्त खवळले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह,गृहमंत्री अमित शहा व किरन रिजीजू यांनी सभागृहात गोंधळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भाजपचे खासदार यांनी प्रचंड गोंधळ घालत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही.
माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकात अनेक खळबळजनक घटनांवर लेख आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना हे पुस्तक प्रकाशित करू दिले नाही.त्यांच्या या लेखात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चिनी सैन्याच्या घुसखोरीकडे कसे दुर्लक्ष केले,यावर प्रकाशझोत टाकला आहे.या पुस्तकातील ते लेख ” कारवान,” या इंग्लिश मॅगझीनमध्ये छापून आले होते.त्याचा आधार घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणास सुरुवात केल्यानंतर अमित शहा व राजनाथसिंह या दोघांनी,” जे पुस्तक प्रकाशित झालेले नाही,त्या पुस्तकातील लेखाचे वाचन करणे, चुकीचे असल्याचे सांगत आक्षेप घेण्यास सुरुवात केली.त्यानंतर भाजपच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली व राहुल गांधी यांना बोलू दिले नाही.त्यामुळे या पुस्तकात एवढे काय लिहिले आहे,ज्याचे वाचन केल्यामुळे सरकार अडचणीत येणार होते.त्यामुळे भारतीयांची उत्सुकता वाढली. आम्ही त्याविषयी ” कारवान,” मध्ये आलेल्या लेखाचा शोध घेतला असता आमच्या वेबपोर्टलला मिळालेली माहिती जशीच्या तशी खाली देत आहोत.
३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८.१५ वाजता भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांचा मला कॉल येतो.चिनी सैनिक आपल्या चार रणगाड्यासह पूर्व लडाखच्या ” रेचीन ला,” बाजूने भारतीय सीमेच्या दिशेने कूच करत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तातडीने संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना घटनेची माहिती दिली.त्यांनी वरीष्ठांचे आदेश जोवर येत नाही,तोवर एकही गोळी चालवू नका, असे आम्हाला सांगण्यात आले.पण सुमारे दोन तास उलटल्यानंतरही कोणताच आदेश न मिळाल्यामुळे लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांचा मला पुन्हा फोन येतो.त्यावर मी त्यांना सांगितले की वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत.या घडामोडीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा मला कॉल येतो की तुम्हाला जे योग्य वाटेल,ते करा,असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे.वास्तविक चिनी सैन्याला रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज होती.मात्र सरकारने निर्णय घेण्यासाठी तब्बल अडीच तास उशीर केला.रात्री दहा वाजता संरक्षणमंत्र्यांनी मला कॉल केला,पण त्यांनी निर्णयाची जबाबदारी लष्करावर ढकलली.सरकारने या प्रकरणी खंबीर भूमिका घेतली नाही व लष्कराला एकटे पाडले,त्यामुळे पुढे जे काही परिणाम होणार होते,त्याची जबाबदारी लष्करावर येणार होती.
यावरून आपले सरकार देशाच्या सुरक्षिततेविषयी किती गंभीर आहे,हे स्पष्ट होते.या लेखामुळेच लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे हे पुस्तक प्रकाशित करण्यास सरकारने परवानगी दिली नाही.

