दीपक मोहिते,
नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांच्या समोर असलेली आव्हाने…
१ ) विकासकामात ठेकेदारांचा होत असलेला मनमानीपणा रोखणे व विकासकामांना वेग देणे, ( शहर स्वच्छता, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरावस्था, अपुरा पाणीपुरवठा, मच्छर व भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट, प्रशासकीय कामकाजात सुधारणा, मनपाच्या स्वतःच्या मालकीच्या शाळा, रखडलेल्या रुग्णालयाचे काम जलदगतीने मार्गी लावणे, चार शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे, फेरीवाले व पार्किंग व्यवस्था करणे, नालेसफाईच्या कामातील बजबजपुरी रोखणे व मनपाची परिवहन सेवा अधिक प्रभावी करणे, )
२ ) करदात्यांची कैफियत व तक्रारी ऐकण्यासाठी तीन महिन्यातून एकदा ” तक्रार निवारण दरबार, ” चे आयोजन करणे,या दरबारात करण्यात येणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे..
३ ) प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणाऱ्या तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या समाजकंटकाकडून वसुली करणारे प्रभाग समितीचे प्र. सहा. आयुक्त व ठेक्यावरील अभियत्यांना खड्यासारखे दूर करणे, ( विरार येथे गेल्या वर्षी अनधिकृत व धोकादायक बांधकामावर वेळीच कारवाई न झाल्यामुळे तीस ते पस्तीस रहिवाशांचे मृत्यू झाले होते. तत्पूर्वी नालासोपारा शहरातील ४१ अनधिकृत इमारतीमधील ४०० कुटुंबे, आज देशोधडीला लागले आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. )
४ ) आपला प्रशासकीय कारभार हा सर्वसमावेशक, पारदर्शक व विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन झाला पाहिजे. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षालाही तेवढेच महत्व असते, प्रशासनाचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी सत्ताधारी व विरोधक यामध्ये समन्वय व लोकांची कामे मार्गी लागण्यासाठी सहकार्याची भूमिका असायला हवी.
५ ) या उपप्रदेशातील नागरिकांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे ” जीवघेणा रेल्वेप्रवास, ” होय. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवनिर्वाचित महापौरानी ” रेल्वेप्रवासी परिषदे, ” चे आयोजन करून केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून रेल्वेप्रवाशांना काही अंशी दिलासा मिळू शकेल.

