दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्रीपदाची जणू लॉटरीच लागली,
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण रद्द होणे,ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही,ही काळ्या दगडावरची रेष होती.हे विलिनीकरण झाले असते तर अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जयंत पाटील यांना द्यावे लागले असते.त्यामुळे सध्या फडणवीस यांनी हे मंत्रीपद तूर्तास आपल्याकडे ठेवले आहे.एकाच व्यक्तीकडे दोन महत्वाची खाती देणे,हे अत्यंत चुकीचे आहे.पण चूक किंवा योग्य या दोन शब्दाशी भाजपला कोणतेही देणेघेणे नाही.त्यामुळे फडणवीस यांनी योग्य खेळी करत गृह व अर्थ ही दोन्ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत.
अर्थखाते हे गृह खात्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अत्यंत महत्वाचे खाते आहे.अजितदादा या खात्यासाठी नेहमीच आग्रही असायचे.कारण राज्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती राहतात.आमदारांना निधी वाटप करताना अजित दादा पवार हे अक्षरशः दादागिरी करत असायचे.त्यामुळे भाजपसह अन्य पक्षाचे आमदार व खासदार खाजगीत त्यांच्या नावाने बोटं मोडीत असत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात अजित पवार यांचा यासंदर्भात पाढा वाचला होता.निधी देताना अजित पवार कसे दुजाभाव करत असत,यांच्या सुरस कथा मंत्रालय परिसरात नेहमीच कानावर पडायच्या.त्यामुळे फडणवीस यांनी हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाऊ दिले नाही.तसेच अजितदादा अर्थमंत्री असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेले सहा ड्रीम प्रोजेक्टचा भला मोठा आर्थिक निधी फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना हाताशी धरून रोखला होता.आज तेच अर्थमंत्रीपद चालुन आले आहे,ते पद पुन्हा इतर कोणाच्या हाती सोपवतील असे वाटत नाही.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण रखडल्यामुळे फडणवीस यांना एकप्रकारची ही लॉटरीच लागली आहे.

