दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ; भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) सरस ठरणार,
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका येत्या ७ फेब्रु. रोजी होत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्यात घेण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यामुळे पहिल्या टप्यातील निवडणुका या आठवड्यात होत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर, छ.
संभाजी नगर, परभणी धाराशिव व लातूर या जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे ) या दोन प्रमुख पक्षानी अभूतपूर्व यश प्राप्त केले. त्यामुळे तमाम राजकीय पक्षांचे अवसान सध्या गळून पडले आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्यामुळे प.महाराष्ट्रात त्यांची ताकद क्षीण झाली आहे.त्याचा फायदा भाजप व शिवसेनेला ( शिंदे गट ) होण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षात भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेने शहरी भागासह ग्रामीण भागात आपले पाय घट्टपणे रोवण्यास सुरुवात केली.येत्या ७ फेब्रु. रोजी होणाऱ्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) व शिंदे गट ( युती न झाल्यास ) अशी तिरंगी लढत होईल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना (उबाठा ), पुणे, सातारा,
सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथे भाजप, शिंदे गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) अशा चौरंगी लढती होतील.परभणी,छ.संभाजी नगर व धाराशिव,येथे भाजप,शिंदे गट, काही प्रमाणात शिवसेना ( उबाठा ) यांच्यामध्ये लढती होतील. तसेच छ.संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम मुस्लिम धार्जिणा पक्ष देखील स्पर्धेत असेल. लातूर जिल्ह्यात भाजप व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

