दीपक मोहिते,
” संवेदना,”
एका वादळाची अचानक झाली एक्झिट…
काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला.दादा इतक्या लवकर एक्झिट घेतील,असे कोणालाही वाटले नव्हते,पण काळाने घात केला.अशाप्रकारे एका वादळाचा शेवट झाला.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.धाडस,अभ्यासूवृत्ती,
स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धत व प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवण्याचे कसब,या गुणामुळे त्यांनी अगदी लहान वयातच खूप काही साध्य केले होते.धाडसी वृत्तीमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.पण आपल्याकडून चूक झाली,हे सांगण्याचे धाडस त्यांच्या अंगी होते.त्यांच्या या स्वभावामुळे ते यशाची एकेक पायरी यशस्वीपणे चढू शकले.निधीवाटपात ते अन्य पक्षाच्या आमदारावर अन्याय करतात,असा त्यांच्यावर आरोप होत असे,पण त्यांनी या आरोपाने विचलित न होता राज्याची आर्थिक बाजू व्यवस्थितपणे सांभाळली होती.राज्याचा जीएसटीचा वाटा वेळेवर मिळावा,यासाठी केंद्र सरकारच्या मागे तगादा लावणारे अजितदादा पवार हे कायम आपल्या लक्षात राहतील.त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले.जलसंपदा व शिखर बँकेतील भ्रष्टाचारावरून त्यांची जनमानसात प्रचंड बदनामी झाली.ही दोन्ही प्रकरणे आजही न्यायालयात प्रलंबित आहेत.त्यांच्या चिरंजीवाने केलेल्या जमिनीचे आर्थिक व्यवहारही त्यांना प्रचंड मनस्ताप देणारे ठरले,पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही.असा हा धाडसी राजकीय नेता आज आपल्यामधून निघून गेला आहे.पण,त्यांची राजकीय कारकीर्द ही कायम तुमच्या आमच्या स्मरणात राहील अशीच आहे.
राजकीय कारकीर्द –
२२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात देवळाली – प्रवरा येथे जन्म,
१९८२ साली राज्याच्या राजकारणात प्रवेश,
१९८५ साली राज्यातील नेते पदमसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी विवाह,
१९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड,
१७ ते १८ सप्टेंबर दरम्यान
बारामती लोकसभामतदारसंघाचे खासदार,
शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा,
त्याचवर्षी विधानसभा सदस्य व कृषी व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री,
१९९२ साली जलसंधारण व ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री,
१९९९ साली पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे राज्यमंत्री,
२०१० साली उपमुख्यमंत्री पदी,जलसंपदा खात्याची सूत्रे,
२०१२ साली पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी,अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी,
२०१४ मध्ये त्यांच्यावर ७० हजार कोटी रु.चा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप,त्यावेळी विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत,
२०१९ मध्ये फडणवीस यांच्यासोबत शपथविधी
मविआचे सरकार आल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी निवड,
२०२२ मध्ये मविआ सरकार कोसळल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदी,
२०२३ साली राष्ट्रवादीमध्ये फूट,खासदार व आमदारांचा त्यांना पाठिंबा,एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारला पाठिंबा,पुन्हा उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती,
२०२४ साली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात त्यांची महत्वाची भूमिका,त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने जागा जिंकत पुन्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान व अर्थखात्याची सूत्रे,
२०२६ विमान अपघातात मृत्यू,

